सोशल मीडियावर सामाजिक, राजकीय, जातीय व धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या एकूण २६ आक्षेपार्ह पोस्ट व व्हिडिओ शहर पोलिसांनी हटविले आहेत. पोलिसांकडून सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. ११ ते ३१ मार्च या काळात शहर पोलिसांनी ३६ प्रकरणांमध्ये १७ जणांविरुद्ध कारवाई केली आहे.दोन धर्मात, जातीत किंवा गटात तेढ निर्माण होईल, अशा आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियातून व्हायरल करणे गुन्हा आहे.
एखादा धर्म किंवा जाती विषयक, महापुरुषांबद्दल बदनामीकारक पोस्ट व्हायरल केल्यास भारतीय दंड विधान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होतो. दुसरीकडे भारतीय माहिती तंत्रज्ञान कायदा २००० नुसार देखील गुन्हा दाखल होतो. ११ ते ३१ मार्च या काळात फौजदार चावडी पोलिसांनी एकाविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. तर, जेलरोड पोलिसांनी एकाविरुद्ध दखलपात्र तर एकावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. जोडभावी पेठ पोलिसांनी एकाविरुद्ध दखलपात्र गुन्हा दाखल केला असून दहा जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.