प्रवाशांच्या सोईसाठी रेल्वे प्रशासनाने मागील आर्थिक वर्षात पुण्याहून विशेष दर्जा असलेल्या तब्बल १९६१ गाड्या सोडल्या. त्यापूर्वीच्या आर्थिक वर्षात ही संख्या ६५८ इतकीच होती. विशेष गाड्यांना वेगळा दर्जा असल्याने तिकीटदर जास्त असतो. त्यामुळे रेल्वेच्या उत्पन्नातही मोठी वाढ झाली.
रेल्वे प्रशासनाने गर्दीच्या हंगामात अतिरिक्त गाड्या सोडल्या. दिवाळी, नाताळ, होळी आदी प्रमुख सणांच्या वेळी या गाड्या सोडण्यात आल्या. उन्हाळ्यात अनेक प्रवासी पर्यटनाचा बेत आखतात. सुट्ट्यांचा हंगाम आल्यावर नेहमीच्या वेळापत्रकातील गाड्यांना गर्दी असतेच. शिवाय विशेष गाड्यांनाही गर्दी होते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या कालावधीत विशेष गाड्या वाढविल्या. त्यामुळे प्रवाशांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला.
गर्दीच्या हंगामात अनेक प्रवाशांना आरक्षित तिकीट मिळत नाही. अशा प्रवाशांना गावी जाणे अवघड होते. त्यांच्यासाठी रेल्वेने विशेष गाड्यांची सोय उपलब्ध करून दिलेली असते. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभला, तर आम्ही अशा गाड्यांच्या फेऱ्या वाढवितो.