अयोध्येत राम मंदिराच्या निर्मितीनंतरची ही पहिलीच रामनवमी असल्याने भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. त्यामुळे देशभरातून रामभक्त अयोध्येत दाखल होत आहेत. परंतु, विमान कंपन्यांनी याचा लाभ घेत तिकीट दरात जवळपास दुपटीने वाढ केली आहे.
मुंबई-अयोध्या विमान प्रवासासाठीचे दर काही दिवसांपूर्वी 6 हजार ते 7 हजारांपर्यंत होते. ते वाढून आता 11 हजार ते 13 हजारांपर्यंत पोहोचले आहेत. ऑनलाईन उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, स्पाईसजेटच्या विमानाचे मुंबई ते अयोध्यासाठी तिकीटदर 15,500 रुपयांपर्यंत आहेत. त्यामुळे प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अयोध्येत येणाऱ्या भक्तांची गर्दी पाहता हॉटेल्स व्यावसायिकांनी देखील आपले दर वाढवले आहेत. सुमारे 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राम मंदिर उभारण्यात आलेय. पहिल्यांदा राम मंदिरात प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी भाविक आतूर आहेत. रामजन्मभूमीदेखील सजली आहे. राम मंदिर देखील विविध रंगीबेरंगी फुलांनी सजवलं आहे. आकर्षक अशी विद्युत रोषणाईने देखील राम मंदिराला करण्यात आली आहे. राम मंदिर ट्रस्टने याचे फोटो आपल्या एक्स अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.
रामनवमीच्या दिवशी पहाटे 3.30 वाजेपासूनच भक्तांना रामलल्लाचं दर्शन घेता येणार आहे. रात्री 11 वाजेपर्यंत भाविकांना रामलल्लाचं दर्शन घेता येणार आहे. रामनवमीनिमित्त 19 एप्रिलपर्यंत व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद असणार आहे. रोज सकाळी 6.30 वाजेपासून भाविकांना दर्शनासाठी मंदिरात सोडलं जाते. मात्र 18 एप्रिल रोजी भाविकांना 6 वाजेपासूनच दर्शन घेता येणार आहेत. अयोध्या नगरीत देशभरातू लाखो भक्त दाखल होण्याचा अंदाज आहे. या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनदेखील सज्ज आहे. गर्दीला नियंत्रित करण्याच नियोजन देखील प्रशासनाने केले आहे.