अयोध्येतील श्रीराम मंदिरात आज, बुधवारी रामनवमीच्या मुहूर्तावर देशभरातील भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली. राम मंदिरात रामललाचा अभिषेक झाल्यानंतर ही पहिली रामनवमी असल्यामुळे भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.
भाविकांनी सरयू नदीमध्ये स्नान करून पहाटे ब्रह्ममुहूर्तात मंदिराकडे प्रस्थान केले. रामनवमीनिमित्त अयोध्येतील राम मंदिरात पूजा करण्यात आली. मंदिरात मंगला आरतीनंतर ब्रह्म मुहूर्तावर पहाटे 3.30 वाजेपासून अभिषेक शृंगार करण्यात आला. त्यानंतर पहाटे 5 वाजता शृंगार आरती संपन्न झाली. रामनवमीच्या निमित्ताने मंदिरात देव दर्शनाची वेळ वाढवून 19 तास करण्यात आली आहे. भाविकांना पहाटे मंगला आरतीपासून रात्री 11 वाजेपर्यंत दर्शन घेता येणार आहे. भाविकांच्या सुविधेसाठी रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र’ तर्फे श्री रामजन्मभूमी प्रवेशद्वारावर, बिर्ला धर्मशाळेसमोर, सुग्रीव किल्ल्याच्या खाली एक प्रवासी सेवा केंद्र उभारण्यात आले आहे. ज्यामध्ये सार्वजनिक सुविधा उपलब्ध आहेत.श्री रामजन्मभूमी मंदिरात होणाऱ्या सर्व कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण अयोध्या महापालिका क्षेत्रातील जवळपास 80 ते 100 ठिकाणी एलईडी लाईटवर केले करण्यात आले होते.