देशात २००९ च्या लोकसभा निवडणुकीत पुरुष-महिला मतदारांची स्वतंत्र नोंद केली जात होती. मात्र, तृतीयपंथींची वेगळी नोंद होत नव्हती. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर २०१४ च्या निवडणुकीदरम्यान पहिल्यांदाच पुरुष व महिला मतदारांबरोबरच तृतीयपंथी अशी तिसरी वर्गवारी करण्यात आली.त्यावेळी राज्यात ९१८ तृतीयपंथी मतदारांची नोंद करण्यात आली होती. गेल्या १० वर्षांत ही संख्या आता ५ हजार ६१७ इतकी झाली आहे. ठाण्यात सर्वांधिक तृतीयपंथी मतदारांची नोंद झाली आहे.राज्यात २०१४ मध्ये ९१८ तृतीयपंथी मतदारांची नोंद करण्यात आली.
त्यानंतर झालेल्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या मतदार नोंदणीनुसार हा आकडा दुपटीने वाढून ही संख्या २ हजार ८६ इतकी झाली. त्यानंतर सध्या लोकसभा निवडणुकीसाठी ४ एप्रिलपर्यंत करण्यात आलेल्या राज्याच्या एकूण मतदार संख्येत ५ हजार ६१७ तृतीयपंथी मतदार आहेत. सर्वांत जास्त तृतीयपंथी मतदारांची नोंद ठाणे जिल्ह्यात करण्यात आली असून येथे १ हजार २७९ मतदारांची नोंद करण्यात आली आहे. मुंबई उपनगरमध्ये ८१२ आणि पुण्यात ७२८ तृतीयपंथी मतदारांची नोंद झाली आहे.