लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी २३ जानेवारीला ३५ लाख ९६ हजार २०६ मतदार होते. तर १९ एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील मतदारांची एकूण संख्या ३६ लाख ५६ हजार ८०३ झाली आहे. तीन महिन्यांत तब्बल ६० हजार ५९७ मतदार वाढले आहेत. हे वाढलेले मतदार उमेदवाराच्या विजयासाठी निर्णायक ठरू शकतात.सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकूण १६ हजार ४३० दिव्यांग मतदार असून त्यापैकी १३२ जणांनीच घरून मतदान करण्याचा पर्याय निवडला आहे. तर ८५ वर्षांवरील २७ हजार २८० मतदार असून त्यापैकी एक हजार ३१८ जण घरून मतदान करतो म्हणाले आहेत. तसेच अत्यावश्यक सेवेतील ५२९ मतदार असून त्यांचे मतदान पोस्टल बॅलेटद्वारे घेतले जाणार आहे. घरून मतदान करणाऱ्यांची मतदान प्रक्रिया २६ ते ३० एप्रिल या काळात होणार आहे. त्या मतदानावेळी निवडणूक कर्मचारी, पोलिस असे कर्मचारी व व्हिडिओग्राफर देखील त्याठिकाणी असणार आहे.
निवडणुकीसाठी सध्या १९ हजार ८२७ कर्मचारी असून ज्यांची खरोखर अडचणी होत्या त्यांची ड्यूटी रद्द करण्यात आल्या आहेत. आचारसंहिता अंमलबजावणी व उमेदवारांच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यात १९६ क्षेत्रीय अधिकारी, २८ स्थिर सर्व्हेक्षण अधिकारी, २४ भरारी पथके, २४ व्हिडिओ सर्व्हेक्षण पथके, सहा व्हिडिओ निरीक्षण पथके आणि सहा खर्चासंबंधीची पथके नेमल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.