सोलापुरात शिकायला असलेल्या जळगावच्या २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सत्यम चौकातील राज पॅलेसमध्ये ही घटना उघडकीस आली. दर्शना प्रवीण पाटील (वय २१, रा. ओम साई रेसिडेन्सी, जळगाव, सध्या रा. राज पॅलेस, सोलापूर) असे तिचे नाव आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
दर्शना ही वालचंद महाविद्यालयात अभियांत्रिकी तृतीय वर्षात शिकायला होती. ती राज पॅलेसच्या चौथ्या मजल्यावरील घरात भाड्याने राहण्यास होती. तिच्यासोबत राहणाऱ्या दोघी दुपारी गावी गेल्या होत्या. त्यानंतर रात्री तिच्या एका मैत्रिणीने तिला कॉल केला, मात्र, ती कॉल घेत नसल्याने ती नऊ वाजता तेथे पोचली. मात्र, तिने दरवाजा उघडला नाही. त्यामुळे तिने शेजाऱ्यांना सांगितले. त्यांनी पोलिसांना कळविले. रात्री दहाच्या सुमारास हेडकॉन्स्टेबल बी. बी. घुगे यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता तिने गळफास घेतल्याचे आढळून आले. तिने स्वयंपाकाच्या खोलीतील छताच्या पंख्याला नायलॉन दोरीने गळफास घेतला होता.