उबाठाकडे बाळासाहेबांचे विचार नाही, धनुष्यबाण नाही. फक्त रोज शिव्याशाप देणे एवढंच काम उरले आहे. आमच्याकडे शिवसेना तर उबाठाकडे शिव्या देणारी शिव्यासेना आहे. यामुळे बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक जीव गेला तरी काँग्रेसला मतदान करणार नाही ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे. काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ आणि उबाठाचा हात काँग्रेस के साथ हे जनतेने ओळखले आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
मुंबईत शिवाजी पार्कमध्ये शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांसह महायुती घटक पक्षांचे सर्व नेते, पदाधिकारी उपस्थित होते.
मुंबईकडे वाकड्या नजरेने पाहिले तर नरेंद्र मोदी घरात घुसुन मारतील, याचा धसका पाकिस्तानने घेतला आहे. मागील १० वर्षात देशात एकही बॉम्बस्फोट झाला नाही.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश मजबूत केला. आज बाळासाहेब ठाकरे असते तर ते बोलले असते मोदी गया तो देश गया, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय भारताला पर्याय नाही, असे गौरवौद्गार मुख्यमंत्री शिंदे यांनी काढले.
महाराष्ट्र का काम, मोदीजी का नाम आणि अयोध्या का राम मागील १० वर्षात त्यांनी एकही सुट्टी घेतली नाही. काहीजणांना पंतप्रधान बनण्याची स्वप्ने पडली आहेत पण घरात बसून देश चालवणार का अशी खरमरीत टीका त्यांनी उबाठावर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देश सुरक्षित ठेवला, गरिबांचे कल्याण केले. भ्रष्टाचार रोखला, अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आणली, लाभार्थींचे पैसे जनधन खात्यात दिले, ८० कोटी जनतेला मोफत रेशन, पाच लाखांचा आरोग्य विमा, महिलांना आत्मनिर्भर केले, बेरोजगारांच्या हाताला काम केले आणि देशाला महासत्तेकडे घेऊन जाणाऱ्या मोदीजींना मत देणार असे प्रत्येक भारतीय मतदार बोलत आहे. महाराष्ट्र का काम, मोदीजी का नाम आणि अयोध्या का राम असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणाले की, शिवसेनाप्रमुखांची शिवतीर्थावरून ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधंवानो’ ही गर्जना देशात गाजत होती. मात्र आज उबाठाला हिंदू म्हणून घ्यायची लाज वाटत आहे. ‘गर्व से कहो हम हिंदू है’, बोलायची हिमंत राहिली नाही आणि हिंदुह्रदयसम्राट म्हणून बोलायला जीभ कचरु लागली आहे, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर गेली. मतांसाठी लाचारी करणारे आपण किती बदलू शकतो हे उबाठाने दाखवून दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भरभरुन प्रशंसा करणारे आज शिव्याशाप देत आहेत. इतक्या जलद गतीने रंग बदलणारा सरडा कोणी पाहिला नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.
बाळासाहेबांनी आपल्या ठाकरे शैलीत सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार, लालूप्रसाद यादव या लोकांवर हल्ला केला. पण याच शिवतीर्थावर उबाठा त्या सर्वांच्या मांडीला मांडी लावून बसले. उबाठाची थेरं पाहून बाळासाहेबांच्या मनाला नक्कीच यातना झाल्या असतील. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या विरोधामध्ये बाळासाहेबांनी स्वतः जोडे मारून आंदोलन केले होते, असे मुख्यमंत्री म्हणाले.
बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की, काँग्रेसचे गवत उपटून टाका, पण त्याच गवतात उबाठा लोळताना दिसत आहेत, हे दुर्दैव आहे. ज्या काँग्रेसने बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार सहा वर्ष काढून घेतला त्या काँग्रेसला माझ मत असे अभिमानाने उबाठा निर्लज्जपणे सांगतात. त्यांना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार नाही. काँग्रेसला साथ देऊन महाराष्ट्रातल्या जनतेच्या पाठीत उबाठाने खंजीर खुपसला, अशी टीका त्यांनी केली.
…आणि म्हणतात माझा बाप चोरला
बिघडलेल्या पोराने चुकीचा रस्ता धरला आणि म्हणतात माझा बाप चोरला, हे बोलणे दुर्दैवी आहे. बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहे. बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती असून तेच घेऊन आम्ही पुढे चाललो आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.