अमेरिकेतील देशांतर्गत हवाई वाहतूक ठप्प झाली आहे. एका तांत्रिक बिघाडाने सर्व विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले असून विमानतळावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. फेडरल एव्हिएशनच्या यंत्रणेत बिघाड झाल्याने अमेरिकेत अभूतपूर्व गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. सर्व विमाने विमानतळावर रोखण्यात आली आहेत. अमेरिकेत झालेल्या या बिघाडाचा परिणाम इतर देशांच्या विमान वाहतुकीवरदेखील होण्याची शक्यता आहे.
अमेरिकेतील यूएस नोटम सिस्टिममध्ये बिघाड झाला आहे. त्यामध्ये दुरुस्ती झाली नाही. हा तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती फेडरल एव्हिएशनच्यावतीने देण्यात आली आहे. हा बिघाड दुरुस्त करण्यास किती वेळ लागेल हे सांगता येणार नसल्याचेही अधिकाऱ्यांनी म्हटले.
नोटम सिस्टिम म्हणजे काय?
एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये नोटम सिस्टीम ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ही यंत्रणा पायलट्सना संभाव्य धोका किंवा विमानतळ धावपट्टी सुविधा सेवांमध्ये बदल आणि उड्डाण दरम्यान संबंधित प्रक्रियेत बदल झाल्यास त्याची माहिती देते. फेडरल एव्हिएशनने सांगितले की, तांत्रिक बिघाडानंतर ‘नोटिस टू एअर मिशन’ जारी करण्यात आला आहे. यामध्ये एका विशिष्ट हवाई क्षेत्रातील विमान सेवा रद्द केली जाते. ही सूचना एखाद्या क्षेपणास्त्र चाचणीच्या वेळेस अथवा लष्करी हवाई उपकरणाच्या चाचणी दरम्यान जारी केले जाते.
बिघाडामुळे काय झाले?
यंत्रणेत बिघाड झाल्याने विमान कंपनी आणि ग्राउंड क्रूजवळ लँडिंग आणि इतर संबंधित माहिती अपडेट होत नाही. त्यामुळे विमान सेवा विस्कळीत झाली. जवळपास 1200 हून अधिक विमानांनी उशिराने उड्डाणे घेतली आहेत.
सकाळपासून परिणाम दिसण्यास सुरुवात
यंत्रणेत झालेल्या तांत्रिक बिघाडाचा परिणाम सकाळपासून दिसू लागला होता. फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट फ्लाइटवेअरनुसार, स्थानिक वेळेनुसार सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास अनेक विमानांचे उड्डाण उशिराने झाली होती. तांत्रिक बिघाड दुरुस्त झाल्यानंतर अमेरिकेतील विमान सेवा पुन्हा सुरळीत होणार आहे.