सोलापूर येथील इंदिरा गांधी पार्क स्टेडिअमवर जानेवारीत दोन रणजी सामने पार पडल्यानंतर आयपीएल किंवा एमपीएलचे क्रिकेट सामने होतील, अशी सोलापूरकरांना आशा होती. मात्र, जिल्हा क्रिकेट असोसिएशनने त्यासाठी प्रयत्न करूनही अपुरी प्रेक्षक क्षमता आणि डे-नाईट सामन्यासाठी लागणारी फ्लड लाइट नसल्याने सोलापुरात ते सामने अशक्य असल्याचे सांगण्यात आले. त्या सुविधांसाठी आता असोसिएशनचा पाठपुरावा सुरू झाला आहे.
सोलापूर शहर-जिल्ह्यात क्रिकेटकडे अनेकांचा कल वाढू लागला आहे. स्मार्ट सिटीतून जवळपास १६ कोटी रुपयांचा खर्च करून सोलापुरातील इंदिरा गांधी पार्क स्टेडिअम आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्यात आले आहे. त्यानंतर याच मैदानावर तब्बल २९ वर्षानंतर महाराष्ट्रविरूद्ध मणिपूर आणि महाराष्ट्रविरूद्ध सौराष्ट्र असे दोन सामने रणजी सामने पार पडले.
आगामी काळात सोलापूरची विमानसेवा सुरू होईल, पंचतारांकित हॉटेल देखील याठिकाणी आहे. त्यामुळे मैदानावर स्क्रीन लावून दरवर्षी आयपीएल किंवा २०-२०चे क्रिकेट सामने पाहाणाऱ्या सोलापूरकरांना आता प्रत्यक्षात आपल्या इंदिरा गांधी पार्क स्टेडिअमवर २०-२०चे किंवा आयपीएल, एमपीएलचे (महाराष्ट्र प्रिमिअर लिग) सामने प्रत्यक्षात पाहता येतील, अशी आशा वाटू लागली आहे. मात्र, त्यासाठी मैदानाची प्रेक्षक क्षमता वाढविण्याची आणि फ्लड लाईटची सोय येथे होणे जरुरी असून त्यासाठी लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा आवश्यक आहे.