मृग नक्षत्राला सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच दिवशी सोलापूर शहर व जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. करमाळा, पंढरपूर, मोहोळ, माढा, सांगोला आदी तालुक्यांमध्ये पावसाचा जोर होता.
यंदाच्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात बहुसंख्य गावे, वाड्यावस्त्यांमध्ये पाणीटंचाईमुळे जनतेची तहान भागविण्यासाठी २०० पेक्षा अधिक टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असताना तसेच पाण्याअभावी धोक्यात आलेल्या केळी, डाळींब, पेरू आदी फळबागांसह उन्हाळी पिके वाचविण्यासाठी धडपडणाऱ्या शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा होती. सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणही तळ गाठत असल्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचीही चिंता निर्माण झाली असताना सुदैवाने यंदा चालू जूनपासून पाऊस सुरू होणार असल्याच्या हवामान खात्याच्या अंदाजामुळे सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.