”पुढील चार महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. कालच्या लोकसभेच्या निवडणुकीत जसं तुम्ही काम केलं. तसंच या विधानसभेच्या निवडणुकीतही काम करा. राज्य हातात घेणार.. आणि तुमचं सर्व दुखणं.. दुरुस्त करणे एवढा एक कलमी कार्यक्रम आम्हा लोकांकडून केला जाईल”, अशी ग्वाही ज्येष्ठ नेते शरद पवारांनी बारामतीकरांना दिली. ज्येष्ठ नेते शरद पवार मागील तीन दिवसांपासून बारामती दौऱ्यावर आहेत. आज पवारांनी बारामतीतील शिरसुफळ आणि उंडवडी या जिरायत भागातील नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, ”जिरायत गावांच्या पाण्यासंदर्भात सुधारणा करण्याची गरज आहे. हे काम करायला राज्य सरकारला आम्ही भाग पाडू. यासंबंधी मी तुम्हाला आजच शब्द देऊ शकत नाही. कारण महाराष्ट्राची सत्ता आम्हा लोकांकडे नाही. मात्र मी निकाल घेतला आहे चार महिन्यांनी निवडणुका आहेत. या निवडणुकीमध्ये मी काही झालं तरी महाराष्ट्राची सत्ता हातात घेणार. सत्ता हातात आल्यानंतर तुमची राहिलेली कामे कशी राहतात हेच मी बघणार”, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला. ”आज राज्याचे राजकारण एका वेगळ्या दिशेने जात आहे. ज्यांच्या हातात सत्ता आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत किंवा आणखी कोणी असो या सर्वांचे लक्ष शेतकऱ्यांकडे नाही”, असेही पवार यावेळी म्हणाले.
पवारांच्या दुष्काळी दौऱ्यात युगेंद्र पवारांचाही सहभाग
”बारामती विधानसभेला युगेंद्र पवारांना उमेदवारी द्या आणि बारामतीचा दादा बदला”, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर पवार यांच्या नियोजित दुष्काळी दौऱ्यात युगेंद्र पवार यांचा सहभाग अनेक अर्थाने महत्त्वाचा मानला जात आहे. बारामतीमध्ये युगेंद्र पवारांच्या जनता दरबारातही शरद पवारांनी अचानक हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे बारामतीतून शरद पवार गटाकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.