पुणे, 24 जून (हिं.स.) पुण्यातील एफसी रस्त्यावरील लिक्विड लेजर लाऊंज या हॉटेलमधील बॉशरूममध्ये काही अल्पवयीन मुले ड्रग्जचे सेवन करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा सत्ताधारी, राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलीस प्रशासन यांच्यावर विरोधकांकडून निशाणा साधला जात आहे.
त्या पार्श्वभूमीवर मी पालकमंत्री असताना अशाप्रकारच्या चिंताजनक घटना घडल्या नाहीत, असं चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं. मात्र, त्यानंतर पुन्हा या विधानावरून त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. ते पुढं म्हणाले, अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत की नाही मला आता आठवत नाहीत. तुम्हालाही आठवत नसतील. पण घडल्याच नाही, असा दावा करता येत नाही ना? पुण्याची लोकसंख्या आधी १४ लाख होती. आता ७० लाख झाली. पुण्यात मोठ्या प्रमाणात उद्योग, व्यवसाय, शिक्षण, रुग्णालये चांगली झाल्यामुळे गर्दी वाढत चालली आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे, धाक निर्माण केला पाहिजे, असं पाटील यांनी म्हटलं आहे.
पुण्यात गेल्या काही वर्षांपासून अमली पदार्थाचा विषय चांगलाच गाजत आहे. आज काही तरुण अमली पदार्थाचे सेवन करीत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यांनतर आमदार रवींद्र धंगेकर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महायुतीच्या मंत्र्यांवर टीका केली यावर उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की , अशाप्रकारच्या घटनांना थेट मंत्र्यांना जबाबदार धरणे योग्य नाही. जर मंत्र्यांची इन्व्हॉलमेंट असल्याचे सिद्ध झाले तर अशापद्धतीने बोलायला हरकत नाही असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.