मुंबई, २५ जून, (हिं.स) पुणे शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी बेकायदेशीर पब्जवर कठोर कारवाई करावी. तसेच अमली पदार्थांशी निगडित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवावा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना दिले आहेत.
पुणे शहरात अमली पदार्थ विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना निर्देश दिले. पुणे शहरातील बेकायदेशीर पब्जवर कठोर कारवाई करावी. अमली पदार्थ विक्रेत्यांविरुद्ध नव्याने कठोर कारवाई सुरु करावी. यासंदर्भातील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवून कठोर कारवाई करावी. पुणे शहराला अमली पदार्थमुक्त शहर करण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय योजावेत, असे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले आहेत.