देगलूर / प्रतिनिधी
महाराष्ट्रातील समस्त बंजारा समाजाचे नेते तसेच दिग्रस विधानसभा मतदार संघाचे विध्यमान आमदार संजय राठोड यांना राज्याचे उपमुख्यमंत्री पद देण्यात यावे अशी मागणी नांदेड जिल्ह्यातील समस्त बंजारा समाजांनी केली आहे. विशेष म्हणजे, संजय राठोड हे बंजारा समाजाचे एकमेव नेतृत्व राज्यात असून यांना उपमुख्यमंत्री पद मिळावे, याकरिता समाज बांधव मंदिरात जाऊन देवाला साकडे घालणार आहे. संजय राठोड हे गेल्या तीस – वर्षांपासून सामाजिक तसेच शिवसेनेच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत.
गेल्या वीस वर्षांपासून ते दिग्रस विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करीत आहे. त्यांनी युती सरकारमध्ये कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद भूषविले आहे. महसूल, जलसंधारण, वन यासह अनेक खाती त्यांनी सांभाळली आहेत. बंजारा समाजात त्यांना मानाचे स्थान असून राज्यभर त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहरादेवी येथे त्यांनी प्रयत्न करुन भव्यदिव्य बंजारा नंगारा भवन उभारले आहे. संजय राठोड यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळविला आहे,आता ते मंत्रिपदाच्या शर्यतीत असून त्यांना उपमुख्यमंत्री पद देण्याची मागणी करण्यात येत आहे.
बंजारा समाजातील वसंतराव नाईक तसेच सुधाकरराव नाईक यांनी यापूर्व महाराष्ट्रात मुख्यमंत्री पद भूषविले आहे. आता संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद देण्याची मागणी समस्त गोर बंजारा बांधवांकडून केली जात आहे. विशाल पवार, बालाजी जाधव, सतीश चव्हाण कपिल चव्हाण, गणेश पवार, संजय राठोड, विजय राठोड, विनोद पवार, करण राठोड, संदीप चव्हाण, सचिन जाधव, अनिल राठोड, दिनेश राठोड सुभाष राठोड, रामराव चव्हाण यांच्यासह हजरो बांधवानी मागणी लावून धरली आहे.