तभा फ्लॅश न्यूज/जमीर काझी : राज्यातील तब्बल 72 वरिष्ठ सरकारी आणि अधिकारी ‘हनी ट्रॅप’च्या जाळ्यात अडकल्याचे खळबळजनक प्रकरण चर्चेत असताना काँग्रेसचे जेष्ठ नेते आ.नाना पटोले यांनी गुरुवारी विधानसभेत त्याबाबत व्हिडीओ असलेला पेनड्राइव्ह सादर करीत याबाबतची माहिती जाहीर करण्याची मागणी केली. यामध्ये अधिकाऱ्यांबरोबरच आजी-माजी मंत्री आणि राजकीय नेते सहभागी असल्याचा आरोपही त्यांनी केला.
नाशिक मधील एका आलिशान फार्महाऊसमध्ये हे ‘कांड’ घडले असून या प्रकरणी नाशिक पोलिसांकडून तपास करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे, असे सांगून नाना पटोले म्हणाले,’ राज्यात हे प्रकरण चर्चेत असून अधिकारी व राजकीय नेत्यांकडून कोट्यावधीची रक्कम घेण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे त्याबाबतची माहिती जनेतला होणे आवश्यक आहे. हे प्रकरण सवेदनशील असून आपल्याला कोणाच्या वैयक्तिक आयुष्य आणि चारित्र्य उध्वस्त करायचे नाही, मात्र सरकारने त्याबाबत सभागृहात स्पष्टीकरण दिले पाहिजे, अशी मागणी केली. शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणाचा तपास तातडीने करून सत्य समोर आणण्याची मागणी केली.
हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकलेल्यांमध्ये नाशिक, मुंबई, पुणे,ठाणे जिल्ह्यातील अधिकारी असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडीओबद्दलही त्याने भाष्य केले. हे व्हिडीओ हनी ट्रॅपचा भाग आहेत की वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या रासलीला आहेत, याबाबत नेमकी स्पष्टता नाही. मात्र,
नाशिकच्या एका पंचतारांकित सुविधा असलेल्या हॉटेलमध्ये हा प्रकार घडला आहे. नाशिकच्या मुंबई नाका पोलिस ठाण्यात याबाबत एका महिलेने तक्रार केली होती. वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांचे व्हिडिओ असल्याने कोणीही अधिकारी आपल्या हनीट्रॅपबाबत समोर येत नसल्याने हे प्रकरण अद्याप गुलदस्त्यात आहे.