तभा फ्लॅश न्यूज/ माहूर : माहूर तालुक्यातील धानोरा या पैनगंगा नदीकाठच्या ठिकाणी नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून चोरीची वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडण्यासाठी दि.15 जुलै रोजी दुपारी 02:00 च्यासुमारास कार्यवाहीसाठी गेलेल्या तहसीलदार व महसूल पथकाला हुलकावणी देत पाचही ट्रॅक्टर घेऊन वाळू तस्कर नदीपात्रातील पाच ते सहा फूट पाण्यातून पलीकडच्या तीराच्या दिशेने विदर्भातल्या भागात पसार झाले होते. या पाच पैकी चार ट्रॅक्टर पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी आज 21जुलै रोजी जप्त करत माहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने वाळू तस्करांमध्ये एकाएकी ‘सन्नाटा’ पसरला असल्याचे दिसून येत आहे.
या घटनेमागील पार्श्वभूमी अशी कि,दिनांक 15/07/2025 रोजी दुपारी 02.00 वाजताचे सुमारास माहूरचे तहसिलदार मुगाजी काकडे यांना तलाठी सज्जा दिगडी अंतर्गत असलेल्या धानोरा गावाजवळ काही वाळू चोरटे पैनगंगा नदिपात्रातील वाळू उपसा करुन ट्रॅक्टरमध्ये भरुन चोरी करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाल्यावरुन तहसिलदार काकडे हे शंकर मल्लारी चंदणकर मंडळ अधिकारी वानोळा, ग्राम महसूल अधिकारी ज्ञानेश्वर विठ्ठलराव पेंटेवाड, पोलिस पाटील बालाजी गोविंद कवाने,तहसील वाहन चालक विलास लक्ष्मण शेडमाके यांना सोबत घेऊन धानोरा येथील जायमोक्याच्या ठिकाणी गेले असता त्यांना दुपारी 03:00 वाजताचे सुमारास ट्रॅक्टर क्रमांक एमएच 29 टीई 0212, एमएच 38 बी 1080 व पासींग क्रमांक नसलेले तीन ट्रॅक्टर असे एकुन पाच ट्रॅक्टरचे चालक मालक हे विनापरवाना अवैधरित्या पैनगंगा नदीच्या पात्रातील वाळू चोरी करुन वाहतूक करत असल्याचे दिसून आले.
यावेळी त्यांना याविषयीची चौकशी करत पकडण्यासाठी गेले असता सदरील पाचही ट्रॅक्टर मधील वाळू जागेवरच रिकामी करुन देत ट्रॅक्टर घेऊन वाळू तस्कर विदर्भातल्या दिशेने पसार झाले होते.याबाबतची रितसर फिर्याद ग्राम महसूल अधिकारी डी.व्ही.पेंटेवाड यांनी दिल्याने माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी गुन्हा दाखल केला होता.
पळवून नेलेल्या या पाचही ट्रॅक्टरचा माहूर पोलीसांकडून कसून शोध घेण्यात येत होता.
दरम्यान, विशेष पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे यांच्या मार्गदर्शनाखाली वाळू तस्करांनी लपवून ठेवलेले पाच पैकी चार ट्रॅक्टर आज सोमवारी माहूर चे पोलिस निरीक्षक गणेश कराड यांनी आपल्या पोलिस पथकासह जप्ती कारवाई करून पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहेत.
या धडाकेबाज यशस्वी कारवाईनंतर बोलताना पोलिस निरीक्षक गणेश कराड यांनी, “यापुढे जर कोणी वाळू तस्करांनी अवैधरित्या वाळू चोरी करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचेवर वाहन जप्तीसह, दंड आणि गुन्हे दाखल होतील!” असा खणखणीत इशारा ट्रॅक्टर चालक मालक वाळू तस्करांना दिला आहे.
या कारवाईत पोलीस निरीक्षक गणेश कराड,सपोनि पालसिंग ब्राह्मण, तपास अधिकारी पोउनि संदीप अन्येबोईनवाड, पोहेका गजानन चौधरी, पोहेका बाबू जाधव,चालक ज्ञानेश्वर भोपळे ,पोका पवन राऊत, सोनटक्के, जाधव,पोहेका पुष्पा पुसणाके, पोका राठोड आदींचा सहभाग होता.