तभा फ्लॅश न्यूज/रामसिग ठाकूर : भोकरदन तालुक्यातील पारध, पिंपळगाव रेणुकाई, वालसावंगी येथील शेतकऱ्यांना युरिया साठी वणवण भटकावे लागत आहे. युरिया खताचा तुटवडा निर्माण झाला असून कृषी विभागाने गांभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्यांची समस्या दूर करावी, अशी मागणी होत आहे. पारध परिसरात शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. शेतीच्या उत्पन्नावरच येथील अर्थचक्र अवलंबून असल्यामुळे पिकांची देखभाल व योग्यवेळी खत व्यवस्थापन खूप महत्वाचे आहे. मात्र, पैसे घेऊन येथील शेतकरी वणवण फिरत आहेत. मात्र, साधे खत देखील उपलब्ध होत नाही.यातच युरिया खताचा तुटवडा निर्माण झाला आहे.गरज नसताना खते उपलब्ध असतात. मात्र, गरजेच्या वेळीच नेमका खतांचा तुटवडा निर्माण होतो. यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.
गेल्या आठवड्यापासून युरिया, १५.१५.१५ तसेच १०.२६.२६ आदी खतांचा साठा संपल्याचे दुकानदार सांगत आहेत. यामुळे येथील शेतकरी खत घेण्यासाठी भोकरदन, मोहोरा येथे जात आहेत. मात्र त्यांना तेथेही खत मिळत नाही. तर काही दुकानदार युरिया खताबरोबर अन्य अनावश्यक खते लिंक पध्दतीने विक्री करीत असल्याचे शेतकरी सांगत आहे. तसेच याबाबत कृषी विभागाशी संपर्क करुनही समाधान होत नसल्याचे पारध परिसरातील शेतकयांचे म्हणणे आहे.कृषी विभागाने मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एका लिंकवर बियाणे व खतांची बुकिंग करण्याचे आवाहन केले होते. त्याला येथील शेतकऱ्यानी प्रतिसाद देत नोंदणी केली. मात्र, त्याचे काय झाले हे त्या शेतकऱ्यांना देखील माहित नाही.
पारध येथे युरिया, १५.१५.१५ तसेच १०.२६.२६ खतांचा साठा संपला असून रॅक लागल्यावरच खते मिळतील, असे येथील दुकानदार सांगत आहेत. मात्र तो साठा येथील क्षेत्रफळाच्या तुलनेत खुपच कमी असतो. दोन ते तीन टन खत मिळते. मात्र, ते पुरत नसल्यामुळे येथे नेहमीच खतांची टंचाई जाणवत असते. शेतकरी मागतील ते बियाणे व हवे तेवढे खत शेतकयाना मिळाले पाहिजे, यासाठी पूर्तता करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
कृत्रिम टंचाई निर्माण करून जादा भावाने खताची विक्री करणे, हा दरवर्षीचा प्रकार आहे. मात्र त्यावर कोणाचे नियंत्रण नसल्याने शेतकऱ्यांना सर्रास नाडले जात आहे. येथील बागायती व कोरडवाहू कापसाला खत व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. मात्र, पैसे घेऊन येथील शेतकरी धाड, मोहोरा, भोकरदन आदी ठिकाणी वणवण फिरत आहेत. मात्र, सद्यस्थितीत कुठेही खत सहज उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. बांधावर खत योजनेचा पुरता फज्जा उडाला असून दुकानात नाही तर बांधावर कुठुन येईल, असे म्हणण्याची वेळ येथील शेतकऱ्यांवर आली आहे. शेतकयांना त्वरित युरिया व खताची उपलब्धता करुन द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
परमेश्वर पाटील लोखंडे माजी पंचायत समिती सभापती पारध बु. :
गावामध्ये आर.सी.एफ.सी .खताची एजन्सी असताना येथील शेतकऱ्यांना बाहेर गावावरून युरिया खत आणावं लागत आहे आणि तेही वाढीव दराने. हा जो खताचा चाललेला काळाबाजार कुठेतरी कृषी खात्याला याची जाणीव करून देणे गरजेचे आहे २६६ रुपये प्रमाणे युरियाची बॅग विकायला पाहिजे परंतु ती बॅग ३३५ रुपयाने शेतकऱ्यांना घ्याव लागत आहेआणि ही जिम्मेदारी आपल्या येथील एजन्सीची आहे परंतु ते न घडता परस्पर गाड्या पार्सल करायच्या आणि २६६ भावाचा युरिया ३५० रुपयाप्रमाणे द्यायचा आणि शेतकऱ्यांची लूट करायची हे धोरण चुकीचे आहे.कृषी विभागाने ही बाब गांभीर्याने घेऊन शेतकऱ्यांची होणारी आर्थिक लूट थांबविणे गरजेचे आहे.
रवी आल्हाट शेतकरी :
एक तर पावसाने पाठ फिरवली त्यामुळे शेतकरी पुरता खचला आहे.त्यातच खतांच्या बाबतीत कृषी सेवा केंद्रावाले वाढीव दराने युरीया खताची विक्री करून आणखी शेतकऱ्यांची आर्थिक लूट करून शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईत ढकलत असल्याचे चित्र पारध परिसरात पहावयास मिळत आहे.या संदर्भात कृषी विभाग मात्र बघ्याची भूमिका घेत आहे.त्यामुळे परिसरातील शेतकरी पुरते वैतागले आहे.कृषी विभागाने या संदर्भात ठोस पावले उचलून योग्य दरात शेतकऱ्यांना खत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे.























