तभा फ्लॅश न्यूज/सोलापूर : महिलांच्या शेतकरी उत्पादक कंपनी, स्वयंसहाय्यता बचत गट यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळण्यासाठी आणि ग्रामीण महिलांचे जीवन समृद्ध होण्यासाठी उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान कार्यरत आहे. महिला बचत गटाच्यां महिलांनी एकत्रित येवुन स्थापन केलेल्या महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने शेतमालाची होत असलेली निर्यात ही निश्चित प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केले.
जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक संदीप कोहिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली उमेद अभियान अंतर्गत स्थापन केलेल्या साऊली महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने आज २१ टन केळी ही इराण या देशात निर्यात करण्यात आली. यावेळी उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, जिल्हा व्यवस्थापक संतोष डोंबे, टेकनोसर्व्हचे मृत्युंजय, चंद्रविर, KD एक्सपोर्टचे किरण डोके, तालुका अभियान व्यवस्थापक अवधूत देशमुख, सुषमा बिचुकले, साऊली शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालक प्राजक्ता पोरे, दिपाली पंढरे,सुवर्णा खबाले, मुक्ता सोमासे ,तबस्सुम शेख, मनिषा बोराडे उपस्थित होत्या.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर म्हणाले की, शेतमाल निर्यात करण्यासाठी व महिलांनी एकत्रित येऊन खरेदी केलेल्या शेतमाल यांना चांगला दर मिळणार असल्याचे कंपनीला चांगला नफा मिळणार आहे. तसेच यामुळे महिलांच्या शेतकरी उत्पादक कंपन्या सक्षम होण्यासाठी मदत होणार आहे. तसेच सदर साऊली महिला शेतकरी उत्पादक कंपनीला मूल्यवर्धन साखळी अंतर्गत केळी प्रक्रिया उद्दोगासाठी प्रकल्प मंजुर आहे. तसेच स्मार्ट प्रकल्प अंतर्गत सदर कंपनीचा प्रकल्प राज्य कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला असुन तो मंजुर झाल्यास केळी प्रक्रिया साठी आणखी मदत मिळून कंपनीच्या माध्यमातून महिलांना व्यवसायासाठी मोठे व्यासपीठ मिळणार आहे.
साऊली शेतकरी महिला कंपनीच्या श्रीमती मनीषा बोराडे म्हणाल्या की, केळी उत्पादन स्थानिक बाजारपेठे पेक्षा जास्त दराने निर्यात होत असल्यामुळे सर्व महिलांना आनंद होत आहे. त्यामुळे भविष्यात कंपनीच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतमाल निर्यात करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी उमेद अभियान मधील सर्व अधिकारी यांचे मार्गदर्शन मिळत असल्याने हे शक्य होत असल्याचे बोराडे यांनी सांगितले.
उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, टेकनोसर्व आणि KD एक्सपोर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने करमाळा तालुक्यातील साऊली शेतकरी महिला उत्पादक कंपनीने २१ टन केळी इराण येथे निर्यात करण्यात आली.
Post Views: 19