तभा फ्लॅशन्यूज/सहयोग प्र.जावळे : कन्नड तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावत तालुक्यातील सगळया महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे.
अतिवृष्टीमुळे तालुक्यातील मध्यम प्रकल्पासह धरणे, नदी नाल्यांना पूर आला आहे तर बऱ्याच गावांचा दि.२६ रोजी संपर्क तुटला होता,या पुरात नदीवरील पूल वाहून गेल्याची घटना घडली आहे तर शहरालगत असलेल्या माळीवाडा परिसरात वाहन वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे.
अंजना नदीवरील तपोवन (निंभोरा) प्रकल्प व गांधारी नदीवरील गंधेश्वर धरण ओव्हर फ्लो झाले आहे तर शिवना नदीला पूर आल्याने तालुक्यातील सर्वात मोठा प्रकल्प शिवना टाकळी प्रकल्पात अतिवृष्टीमुळे पाण्याचा ओघ सुरू आहे.तर आंबा येथील लघु प्रकल्पात ९६.४६ टक्के पाणीसाठा झाल्याने आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
अतिवृष्टीमुळे तालुक्यातील रब्बी पिकांचे मात्र मोठे नुकसान झाले असून शेतात पाणी साचल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे जर असेच वातावरण राहिले तर रब्बी पिकांना याचा मोठा फटका बसणार आहे.