तभा फ्लॅश न्यूज/माहूर : डायल ११२ सारख्या आपात्कालीन सेवेचा गैरवापर करून वारंवार कॉल करुन खोडसाळपणे खोटी माहिती देऊन पोलिसांना विनाकारण त्रास देणाऱ्या माहूर तालुक्यातील मेट येथील एका तरुणास पोलिसांनी ताब्यात घेत कडक कारवाई केली आहे.
डायल ११२ या आपात्कालीन हेल्पलाइन नंबरवररुन वारंवार कॉल करुन खोडसाळपणे खोटी माहिती देत पोलिसांना विनाकारण त्रास देणाऱ्या माहूर तालुक्यातील मौजे मेट येथील एका तरुणाविरुद्ध पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करून त्यास ताब्यात घेण्यात आल्याची घटना शनिवारी घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
मौजे मेट येथील एक ३५ वर्षीय इसम व्यवसाय चालक याने डायल ११२ वर माहूर पोलिसांना वारंवार, सतत पणे कॉल करून खोडसाळ पणे खोटी माहिती दिली कि, “मौजे मेट येथे अवैध दारू विक्री चालू आहे!असे सांगितले. यावरून लगेच पोलीसांनी सदरील ठिकाणी जाऊन तपास केला असता कुठेही अवैध दारू विक्री होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले नाही.
पोलिसांना खोटी माहिती देऊन दिशाभूल केल्याचे लक्षात येताच पोलिसांनी माहिती देणाऱ्याच्या फोनचे लोकेशन ट्रेस करत सदर ठिकाणी पोलीस गेले असता कॉलर हा कॉल उचलत नव्हता. नंतर त्याने मोबाईल बंद केला. त्यानंतर त्याचे घरी जाऊन दारू विक्री कुठे चालू आहे? असे पोलिसांनी विचारपूस केली असता कॉलरने खोडसाळ पणे खोटी माहिती ११२ वर कॉल करून दिल्याचे सांगितले.यावरुन पोलिसांनी सदरील खोटारड्या तरुणास ताब्यात घेतले.
भारतीय न्याय संहिता (बीएनएस) मधील कलम २१२ खोटी माहिती देणे किंवा खोट्या माहितीचा प्रसार करणे याबद्दल आहे. जर कोणी सार्वजनिक सेवकाला कोणत्याही विषयावर माहिती देण्यास कायदेशीररित्या बांधिल असेल, आणि त्याला माहीत असलेल्या किंवा खोट्या असल्याचे त्याला वाटत असलेल्या गोष्टी सत्य म्हणून सांगितल्या, तर ते या कलमाखाली गुन्हा ठरतो. जर कोणी जाणूनबुजून खोटी माहिती देत असेल किंवा सत्य माहिती लपवत असेल, तर तो या कलमाखाली दोषी ठरतो.
यावरून सदर इसमावर डायल ११२ वर वारंवार, सतत पणे कॉल करून खोडसाळ पणे सार्वजनिक सेवक,
लोकसेवकास त्रास होईल या उद्देशाने खोटी माहिती दिल्याने त्याचे विरुद्ध कलम २१२ बि एन एस प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
सदरील कारवाई पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि संदीप अन्येबोईनवाड,पोहेका चालक जाधव,पवन राऊत,ज्ञानेश्वर खंदाडे यांचेसह होमगार्ड यांनी पार पाडली.