तभा फ्लॅश न्यूज/भोकरदन : माळेगाव कमान ते वालसा चौफुली रस्ता ‘चोरीला गेल्या’चा धक्कादायक प्रकार समोर आला असून, संतप्त ग्रामस्थांनी आज राज्य मार्ग ५१ वर भव्य रास्ता रोको आंदोलन केले. लोकजागर संघटनेचे अध्यक्ष आणि वालसा येथील माजी सरपंच सुभाष रावजी पोटे तसेच केशव पाटील जंजाळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पंचायत समितीने हा रस्ता त्यांच्या अखत्यारीतच नसल्याचे लेखी दिल्याने, २५ वर्षांपासून या रस्त्यावर काढलेल्या ‘बोगस बिलां’च्या चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे.
काय आहे प्रकरण?
माळेगाव कमान ते वालसा चौफुली या रस्त्याची गेल्या २५ वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्था आहे. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता, हेच समजेनासे झाले आहे. याच रस्त्यावर अनेकदा डागडुजीच्या नावाखाली बोगस बिले काढल्याचा आरोप श्री. केशव पाटील जंजाळ यांनी केला आहे. या गंभीर प्रश्नावर १४ जुलै २०२५ रोजी जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक आणि कार्यकारी अभियंता यांना लेखी निवेदन देण्यात आले होते. मात्र, प्रशासनाकडून ठोस कार्यवाही न झाल्याने आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
आंदोलनादरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पंचायत समितीच्या उपअभियंतांनी (शेजुळ साहेब आणि शेळके साहेब) चक्क लेखी स्वरूपात सांगितले की, “माळेगाव ते वालसा चौफुली हा रस्ताच अस्तित्वात नाही आणि त्याचे कोणतेही रेकॉर्ड आमच्याकडे नसल्याने त्यावर निधी टाकणे शक्य होणार नाही.” या अजब उत्तराने आंदोलक चांगलेच संतापले.
बोगस बिलांची चौकशीची मागणी
यावर बोलताना केशव पाटील जंजाळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “जर हा रस्ता अस्तित्वातच नसेल, तर गेल्या पंचवीस वर्षांपासून या रस्त्याच्या नावावर बोगस बिले कोणी काढली? आणि ती का काढली? याची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.
श्रीक्षेत्र वालसा आणि मिरची बाजारपेठेचा रस्ताही बेहाल
वालसा येथील श्रीक्षेत्र मारुती जागृत देवस्थानाकडे जाणारा कोल्हापूर पाटी ते वालसा हा रस्ताही गेल्या २०-२५ वर्षांपासून दुर्लक्षित आहे. गुडघ्याएवढे खड्डे पडल्याने भाविकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. तसेच, वालसा हे मिरचीचे मोठे बाजारपेठ असल्याने महाराष्ट्राभरातून व्यापारी येथे येतात. हा रस्ताही फक्त वरवर डागडुजी करून तात्पुरता दुरुस्त केला जात असल्याने अनेक अपघात झाले आहेत, काहीजणांनी तर जीवही गमावला आहे.
ग्रामस्थांचा एल्गार
या दोन्ही रस्त्यांची तातडीने दुरुस्ती व्हावी आणि बोगस बिलांची चौकशी व्हावी, या मागणीसाठी कोठा जहागीर, माळेगाव, गोळेगाव, कोळगाव, गोदरी, बोरगाव जहागीर, वालसा,कोसगाव महादेव वाडी, मोहलाई, रेलगाव, पिंपळगाव रेणुकाई येथील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभाग घेतला. माजी पंचायत समिती सदस्य बाबुरावजी ताडे, सुदाम पाटील देठे, अरुणजी बनकर, माजी सरपंच पंडित रावजी गावंडे, पुंडलिकरावजी गावंडे, समाजसेवक उत्तमरावजी गावंडे साहेब, डॉ. ईश्वर वाघ, माजी सरपंच ज्ञानेश्वर कुदर, सुभाषजी जामुन दे, सचिनजी तेलंग्रे, मोहनजी कतोरे, शेख रशीद पठाण, परमेश्वर चोरमारे, सटवाजी शेळके, सामाजिक कार्यकर्ते बाळू कथोरे, माजी सरपंच दादाराव आगळे यांच्यासह मोठ्या जनसमुदायाने या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला.
प्रशासनाला शेवटचा इशारा
यावेळी माजी सरपंच पुंडलिक रावजी गावंडे यांनी आठवण करून दिली की, “हा रस्ता १९७२ मध्ये झाला होता आणि त्यानंतर त्यावर डांबरीकरण व दुरुस्तीही झाली आहे. मग त्याचे रेकॉर्ड कुठे गेले? हा रस्ता चोरीला गेलेला आहे, याचा शोध घ्यावा लागेल.”
तहसीलदार भोकरदन यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र, सुभाषरावजी पोटे आणि केशव पाटील जंजाळ यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, “पुढील काळात जर प्रशासनाने या रस्त्याला तात्काळ निधी उपलब्ध करून दिला नाही आणि त्याचे काम सुरू केले नाही, तर याही पेक्षा मोठे आणि तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”
स्थानिक नागरिकांच्या या संघर्षाकडे आता राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन कसे पाहते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!
तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...