तभा फ्लॅश न्यूज/गंगापूर : अमळनेर परिसरात दोन निष्पाप वन्य प्राण्यांवर अॅसिड टाकून करण्यात आलेल्या अमानुष हल्ल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ही घटना केवळ कायद्याचे उल्लंघन नसून, मानवी संवेदनशीलतेवरही घाला असल्याची प्रतिक्रिया विविध स्तरातून व्यक्त होत आहे.
या घटनेची गंभीर दखल घेत आमदार प्रशांत बंब यांनी पोलिस आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधत संपूर्ण माहिती मागवली. या कृत्यावर तीव्र संताप व्यक्त करत त्यांनी म्हटलं, “अशा नराधमांची जागा जंगलात नाही, तुरुंगातच आहे.”
“ही घटना वन्यजीव संरक्षण कायद्याचे थेट उल्लंघन असून, संबंधित आरोपी कोणताही असो त्याला तत्काळ अटक झाली पाहिजे आणि कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे,” असे बंब यांनी स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, वन विभागाकडून घटनेचा तपास सुरू असून परिसरातील काही संशयितांवर पोलिसांची नजर आहे. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.