तभा फ्लॅश न्यूज/ माहूर : आपण जे मिळवतो त्यावरून आपण जगतो, पण आपण जे देतो त्यावरून आपण जीवन जगतो .” जर तुम्ही शंभर लोकांना खाऊ घालू शकत नसाल तर फक्त एकाला खाऊ घाला.” अन्नदान हे सर्व दानांमध्ये श्रेष्ठ दान’ मानले जाते.अन्नदान ही भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाची परंपरा आहे.अन्नछत्र ही संकल्पना याच श्रद्धेवर आधारित आहे. आणि याच प्रेरणेतून ही धार्मिक परंपरा जोपासत निस्वार्थ भावनेने आणि गरजूंना मदत करण्याच्या उद्देशाने माहूरगड येथील श्री दत्तात्रेय शिखर संस्थान दत्तात्रेय मंदिर येथील परिक्रमा यात्रे दरम्यान शहरातील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य महाप्रसादाचा लाखो भाविकांनी लाभ घेतला.
मनीष पाटील मित्र मंडळ, यवतमाळ यांच्या सहकार्याने आणि श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या आयोजनातून हा महाआयोजन करण्यात आले. यात्रेतील भाविकांसाठी पहाटे ३ वाजल्यापासून ते रात्री ११ वाजेपर्यंत महाप्रसादाची अखंड सेवा सुरू होती. या सेवेसाठी ३० क्विंटल तांदूळ, २ क्विंटल बुंदी, १ क्विंटल सुजीचा शिरा असे स्वादिष्ट पदार्थ प्रेमाने भाविकांसमोर वाढण्यात आले. यात्रेच्या गर्दीत भाविकांना चहा व बिस्कीट याचीही सोय उपलब्ध होती, ज्यामुळे दिवसभर यात्रेतील थकवा दूर झाला.
सेवेत श्री स्वामी समर्थ अन्नछत्रातील विश्वस्त मंडळ आणि माहूर,ढोकी करंजखेड येथील स्वामी समर्थ सेवेकरी मंडळी अहोरात्र कार्यरत होती. ‘अन्नदाता सुखी भव’ या भावनेने सेवेकऱ्यांनी प्रत्येक भाविकाला प्रेमाने प्रसाद देत आपली सेवा पूर्ण केली.
महाप्रसादाची उत्तम मांडणी, सुयोग्य नियोजन आणि सेवाभावाची सेवा भावना पाहून भाविकांनी समाधान व्यक्त केले. अनेकांनी हा अनुभव आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असल्याचे सांगितले. माहूरगडच्या पवित्र वातावरणात अन्नछत्र मंडळाने साकारलेला हा सेवायज्ञ भक्ती, दान आणि मानवतेचा अद्वितीय संदेश देऊन गेला.
माहूर सारख्या धार्मिक तिर्थक्षेत्र ठिकाणी येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून मागील अनेक वर्षांपासून चालवलेले जाणारे अन्नछत्र म्हणजे जेथे देवदर्शनासाठी आलेल्या गरजू यात्री भाविकांना आणि प्रवाशांना मोफत अन्न महाप्रसाद म्हणून दिले जाते असे अन्नपूर्णा ठिकाण होय. या ठिकाणी चालविण्यात येणारे अन्नछत्रातून अन्नदान हे एक प्रकारचे धर्मादाय कार्य आहे, जिथे धार्मिक आणि सामाजिक भावनेतून अन्नदान केले जाते. याठिकाणी
मोफत भोजनाची व्यवस्था: प्रवाशांना, मोफत जेवण दिले जाते. धार्मिक श्रद्धेने आणि सामाजिक बांधिलकीतून हे अन्नछत्र चालवल्या जाते. गरिबांना आणि गरजूंना अन्न उपलब्ध करून देणे, प्रवाशांना जेवणाची सोय करणे, अन्नदानासारख्या धार्मिक आणि सामाजिक कार्यांना प्रोत्साहन देणे, समाजात अन्नसुरक्षा आणि समता निर्माण करणे.
याच उद्देशाने सामाजिक बांधिलकी व धार्मिक परंपरेतून माहूर चे स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळांकडून भाविकांसह गरजूंना यात्राकाळात महाप्रसाद व दररोज स्वच्छ आणि सकस अन्न हे धार्मिक स्थळांचे सर्व नियम पाळून श्रद्धा आणि भक्ती मार्गातून
मोफत अन्नदान अविरतपणे सुरू आहे.