तभा फ्लॅश न्यूज/ अंबड : महिला बचत गटातील अनेक महिला कौटुंबिक गरजा, व्यवसाय किंवा इतर कर्जफेडीसाठी फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेत आहेत. हे कर्ज वैयक्तिक स्वरूपात नसून गटाच्या माध्यमातून घेतले जाते. मात्र, आर्थिक अडचणीमुळे काही महिला हप्ते वेळेवर भरू शकत नाहीत, त्यामुळे फायनान्स कंपनीचे एजंट त्यांच्या घरी जाऊन वारंवार तगादा लावतात.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, शहरातील शेकडो महिला अशा कर्जाच्या जाळ्यात अडकलेल्या आहेत. हप्ते न भरल्यास सामाजिक प्रतिष्ठेला धक्का बसण्याची भीती व अपमानाच्या भीतीमुळे कुणीही उघडपणे आवाज उठवत नाही. बचत गटाचा हप्ता मासिक असतो, तर फायनान्स कंपनीचा हप्ता आठवड्याला किंवा पंधरा दिवसाला घेतला जातो, ज्यामुळे महिलांवर अधिक आर्थिक ताण येतो.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे उल्लंघन करून अनेक फायनान्स कंपन्या शहरात बिनधास्तपणे काम करत असल्याचा आरोप आहे. या कंपन्यांचे एजंट महिलांचे शोषण व आर्थिक पिळवणूक करीत असल्याने पोलिसांनी आणि लीड बँकेने तातडीने कारवाई करण्याची, तसेच वसुलीच्या नावाखाली सुरू असलेला छळ तातडीने थांबवण्याची मागणी होत आहे.