तभा फ्लॅश न्यूज/मुक्रमाबाद : मुखेड तालुक्यात तब्बल २५० मि.मी. पावसामुळे महापूराची भीषण स्थिती निर्माण झाली आहे. या पुरामुळे जनावरे वाहून गेली, घरे, पूल व रस्त्यांचे मोठे नुकसान झाले, तर शेतकऱ्यांचे पिके अक्षरशः उद्ध्वस्त झाली. काही ठिकाणी माणसांचीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आली आहे.
या पार्श्वभूमीवर शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तहसील कार्यालयामार्फत निवेदन सादर करून, पंचनाम्याच्या वेळ न घालवता तात्काळ मदत जाहीर करावी अशी ठाम मागणी केली आहे.
मध्यरात्री आलेल्या महापुरामुळे अनेक गावांचा संपर्क पूर्णतः तुटला. ट्रॅक्टरसारखी वाहने देखील पुराच्या प्रवाहात वाहून गेली. पहाटेपर्यंत स्थानिक नागरिक जीव मुठीत धरून सुरक्षित स्थळी पोहचण्याचा प्रयत्न करत होते. सकाळनंतर प्रशासन, एनडीआरएफ व लष्कराच्या पथकांनी बचाव कार्य हाती घेतले. मात्र, अनेक नागरिक अद्याप बेपत्ता असून मृत्यूची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.