बार्शी – माहिती अधिकार कायदा हा समाजातील लोकशाही प्रदान देशासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि नागरिकांना आत्मसन्मान देऊन पारदर्शकतेसाठी वापरला जाणारा एकमेव कायदा असून तो नागरिकांसाठी प्रशासकीय कामकाजातील खुलेपणासाठी वरदान ठरला आहे, असे प्रतिपादन यशदा पुण्याचे राज्य प्रशिक्षक माहिती अधिकार कायद्याचे अभ्यासक शिवाजीराव पवार यांनी बोलताना सांगितले.
बार्शी शहर पोलीस स्टेशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनानिमित्त आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. प्रारंभी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी शिवाजीराव पवार यांचा सन्मान केला.
पवार बोलताना पुढे म्हणाले की, माहिती अधिकार कायदा हा पारदर्शकतेसाठी वापरला जातो. प्रशासनामध्ये लोकसहभाग वाढावा आणि प्रशासन आणि कार्यालय यामध्ये नागरिकांचा सहभाग वाढून कार्यालयीन कामकाज सुलभ आणि पारदर्शक होण्यासाठी हा उपयोगी ठरला आहे. कायद्याला आता वीस वर्षे झाली आहेत. त्यामुळे अत्यंत चांगला अनुभव कार्यालयीन कामकाजात येत आहे. दर सोमवारी सर्व शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांना सर्व अभिलेखांचे निरीक्षण पाहणी करता येईल अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. नागरिकांनी जास्तीत जास्त प्रशासनामध्ये सहभाग घेऊन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशीही पवार बोलताना पुढे म्हणाले. पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे म्हणाले की, हा कायदा सकारात्मक असून नागरिकांनी त्याचा योग्य वापर केला पाहिजे आणि कामाची फक्त माहिती मागितली पाहिजे. अवास्तव माहिती मागण्याने प्रशासनावर ताण येतो, अशीही ते म्हणाले. यावेळी मणिपाल टेक्नॉलॉजीचे एरिया हेड ऋषिकेश उकिरडे यांचा सन्मान करण्यात आला आणि पोलीस कर्मचाऱ्यांसाठी विविध शासनाच्या योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक ढोणे, जगताप, कुंजीर आदी अधिकारी आणि अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन पोलीस हवालदार मुंडे आणि मुळे यांनी केले.