सोलापूर – हिंदू धर्मातील महत्वाचा असणारा सण दिवाळी अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपल्याने शहरातील महत्त्वाच्या बाजारपेठा मधला मारुती, टिळक चौक, कुंभार वेस, कौतम चौक येथे दिवाळीनिमित्त गृह सजावटीसाठी लागणारे विविध साहित्य विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. दिवाळीच्या अनुषंगाने दारांना लावण्यासाठी आकर्षक तोरण, झुंबर, त्यासोबत आर्टिफिशियल फुले, पणती, रांगोळी आदींची खरेदी करण्यासाठी आबालवृद्धांनी विशेषता: महिलांची मोठी गर्दी दिसून येत आहे. आर्टिफिशियल अनेक वस्तू महिलांना भुरळ घालणाऱ्या ठरत आहेत. यांसह आकर्षक विद्युत रोषणाई करण्यासाठी देखील भारतीय बनावटीच्या लाईटच्या माळा लक्ष वेधून घेत आहेत. याशिवाय लहान मोठे आकाशदिवे भाव खात आहेत.
तर दुसरीकडे बाजारात रांगोळी मोठ्या प्रमाणात दाखल झाली आहे. दिवाळीनिमित्त रांगोळी काढणे आणि त्यात रंग भरणे हे महिलांवर्गाचे आवडीचे काम असते. फ्लॅट संस्कृतीतील कमी जागेमुळे बाजारात स्टिकर्स, आर्टिफिशिअल रांगोळी काढली जात आहे. मात्र, यंदा वुडन, वुलन आणि मॅट रांगोळीचा पर्याव उपलब्ध आहे. वुडन रांगोळी ही इतर रांगोळीसारखी छाप करून काढली जाणारी रांगोळी नाही. स्टिकरसारखी चिटकवायची देखील गरज नाही. तर ही रांगोळी आपण एका जागेवरुन कुठेही नेऊन ठेवू शकतो.
तसेच, रांगोळी पुसण्याची भीती नाही. यामध्ये लाकडी नक्षीदार साच्यामध्ये रंग भरुन ही रांगोळी दारामध्ये किंवा यरामध्ये कुठेही ठेवू शकता. वेगवेगळ्या गोल, चौकोनी अशा आकारामध्ये ही रांगोळी उपलब्ध आहे. दारासमोर, उंबऱ्यावर, देवघरासमोर, अंगणात, बैठक खोलीच्या मध्यभागी लावण्यासाठी स्टिकर रांगोळी सोयीची ठरत असून, आकार आणि प्रकारानुसार त्यांची किंमत ठरत आहे. १५ ते २० रुपयांपासून पुढे अशा किमतीला उपलब्ध असलेली ही रांगोळी खरेदी करण्ययाकडे महिलावर्गाचा वाढता कल दिसून येत आहे.
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील विविध बाजारपेठेत महिलांसह आबालवृद्धांची विविध गृहसजावटीच्या साहित्यांची खरेदीसाठी एकच गर्दी जमलेली दिसत आहे.


















