पंढरपूर – कार्तिक शुद्ध एकादशीला पंढरपूर शहरात मोठ्या प्रमाणात यात्रा भरते. कार्तिकी शुध्द एकादशी रविवार दि. २ नोव्हेंबर, २०२५ रोजी असून, यात्रा कालावधी दि.२२ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर असा आहे. यात्रा कालावधीत दर्शनरांगेतील भाविकांचे जलद व सुलभ दर्शन होण्याच्या दृष्टीने शासन निर्णयातील मार्गदर्शक सुचनांचे तंतोतंत व काटेकोरपणे पालन करावे. तसेच दर्शनरांगेचे सुयोग्य नियोजन करून सर्वसामान्य भाविकांना शांततेने दर्शन देण्याची व्यवस्था करावी. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी संबधित विभागाला दिले आहेत.
शासनाने उत्सवाच्या दिवशी व इतर महत्वाच्या दिवशी कोणत्याही मंदिरामध्ये भाविकांना दर्शन देण्याबाबत शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०१०/३५/(प्र.क्र.८५)/का. सोळा दि.०७/०९/२०१० अन्वये मार्गदर्शक सुचना केलेल्या आहेत. राज्यातील महत्वाच्या मंदिरांमध्ये उत्सवाच्या वेळी व इतर महत्वाच्या दिवशी काही भक्तांना नियमित प्रवेशद्वारातून न सोडता इतर प्रवेशद्वारातून दर्शनासाठी प्रवेश दिला जात असल्याने गर्दीच्या वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याच्या अनेक तक्रारी प्रसारमाध्यमांद्वारे व प्रत्यक्ष प्राप्त होतात. अनेक देवस्थानांमध्ये उत्सवांच्या दिवशी अथवा इतर महत्वाच्या दिवशी व्ही.आय.पी. दर्शन तसेच काही ठिकाणी शुल्क, देणगी इ. आकारुन दर्शन दिले जाते. सर्व महत्वाच्या देवस्थानांमध्ये सर्वसामान्य भाविकांना समानतेने व शांततेने दर्शन दिले जावे व कोणत्याही भाविकास अन्य मार्गाने दर्शन – देण्यात येऊ नये तसेच रांगेचे सुयोग्य पद्धतीने नियोजन करणे आवश्यक आहे.
देवस्थानातील उत्सवाच्या दिवशी तसेच इतर महत्वाच्या दिवशी कोणत्याही व्यक्तीस नियमित रांगेव्यतिरिक्त अन्य कोणत्याही मार्गाने दर्शन घेण्यास परवानगी देण्यात येऊ नये व तशी कोणतीही स्वतंत्र व्यवस्था करण्यात येऊ नये. देवस्थानांमध्ये उत्सवाच्या दिवशी व इतर महत्वाच्या दिवशी कोणत्याही मार्गाने (शुल्क, देणगी, फी इ.) रक्कम आकारुन दर्शनासाठी प्रवेश देण्यात येऊ नये. देवस्थान समितीने संबंधित देवस्थानातील महत्वाचा उत्सवाचा दिवस व गर्दीचा दिवस कोणता आहे. याबाबत दर्शनी भागावर स्पष्टपणे दिसेल अशा प्रकारे ठळक अक्षरात फलक लावणे बंधनकारक राहील. तसेच याबाबत समितीने संबंधित सहायक धर्मादाय आयुक्तांना माहिती देणे आवश्यक राहील. देवस्थान समितीने महत्वाच्या सणाच्या दिवंशी व इतर केव्हाही दर्शनाकरिता पासेस वा प्रवेश पत्रिका वितरीत करु नयेत. कोणत्याही देवस्थानांमंध्ये उत्सवाच्या व इतर महत्वाच्या दिवशी सर्व भाविकांना समानतेने एकाच रांगेतून प्रवेश देण्यात यावा, तसेच विश्वस्त, अधिकारी व पोलीस यांनी आपल्या पदांचा दुरुपयोग करुन भक्तांना सामान्य, रांगेंव्यतिरिक्त इतर कोणत्याही मार्गाने प्रवेश देऊ नये असेही शासन निर्णयात नमुद केले आहे.
या शासन निर्णयातील मार्गदर्शक सुचनांचे उल्लंघन झाल्यास राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये कारवाई करण्यात येईल याची संबधितांनी नोंद घ्यावी अशा सूचनाही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या आहेत.




















