मुंबई – कोरोनानंतर ठाण्यात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा गाजावाजा करीत सुरु केलेल्या ‘आपला दवाखाना’चा पुरता बोजवारा उडाला आहे. अपुऱ्या सुविधा व साधनामुळे महापालिकेचे ही योजना 50 पैकी तब्बल 44 ठिकाणी बंद पडली आहे. त्याजागेत आता साड्या विक्रीची साड्यांचे दुकान सुरू केली आहेत. त्यामुळे मित्रपक्ष भाजपा संतप्त झाली असून आंदोलनाचा इशारा दिला आहे. आमदार संजय केळकर यांनी त्याबाबत जोरदार टीका केली आहे.
एकनाथ शिंदे यांनी 2023 मध्ये गाजावाजा करत ‘हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ ही योजना ठाणेकरांसाठी सुरू केली होती. गरीब, गरजू आणि अति दुर्बल घटकांना मोफत प्राथमिक उपचार मिळावेत , असा या योजनेचा उद्देश होता. यात 30 प्रकारच्या चाचण्या, 105 प्रकारची औषधं, 66 उपकरणं आणि तब्बल 210 कोटींचा निधी या योजनेला दिला होता. परंतु, सध्याचे चित्र फार वेगळे आहे.
ठाण्यात सुमारे 50 ठिकाणी ‘आपला दवाखाना’ केंद्रं उभारली गेली. पण आता त्या दवाखान्यांपैकी अनेक ठिकाणी दरवाजे बंद आणि बॅनर धुळ खात पडलेले दिसत आहेत. त्यापैकी मानपाडा भागातील एका आपला दवाखाना केंद्राच्या जागेत साड्याचं दुकान सुरू झालय. मालकाच्या मते ठेकेदारानं भाडं थकवले. त्यामुळे हा गाळा साडी विक्रेत्याला दिला. दोन वर्षांच्या करारात पहिलं वर्ष ठीक होते. पण दुसऱ्यावर्षी ठेकेदाराने त्यामुळं होणारे नुकसान टाळण्यासाठीच पर्यायी मार्ग स्वीकारला. येणाऱ्या काळात प्रश्न मार्गी न लागल्यास महापालिकेवर आंदोलन करू, असा इशारा स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी दिला आहे.
———–
ही गरीब जनतेची थट्टा :
प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि ठेकेदाराच्या नफेखोरीमुळं ठाण्यातील 44 दवाखान्यांचा बोजवारा उडाला आहे. ठेकेदाराने वेतन दिलेले नाही. 56 लाखांचा दंडही भरला नाही. ही गरीब जनतेची थट्टा आहे. आम्ही आयुक्तांना सांगितले आहे , या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून कर्मचाऱ्यांचा पगार द्यावा,
:आ.संजय केळकर ( भाजपा )



















