सोलापूर – शहर गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई करत शहरात विक्रीसाठी आणलेला १ लाख ८ हजार रुपये किंमतीचा ३६ ग्रॅम (एम.डी.) अंमली पदार्थ जप्त केला आहे. या प्रकरणात पुण्याच्या मोहमद अझहर हैदरसाहेब कुरेशी (वय ३७, रा. भिमपुरा लेन, सेंटर स्ट्रीट, कॅम्प, पुणे) याला अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणात गुन्हे शाखेतील उप निरीक्षक शामकांत जाधव, हवालदार बापू साठे व त्यांचे सहकारी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या इसमांवर कारवाईसाठी शहरात पेट्रोलिंग करत असताना, त्यांना दि. २८ ऑक्टोबर रोजी माहिती मिळाली की एक अनोखळी व्यक्ती सोलापूर एसटी स्टँड परिसरात एम. डी.विक्रीसाठी येणार आहे. ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला. संशयित इसमाला ताब्यात घेतले. अंगझडतीमध्ये त्याच्या पँटच्या खिशात असलेल्या प्लास्टिकच्या पिशवीतून पांढऱ्या रंगाची एमडीसदृश्य पावडर आढळून आली.
फॉरेन्सिक तपासात अंमली पदार्थ असल्याची खात्री घटनास्थळीच पोलीस आयुक्तालयातील फॉरेन्सिक टीमला बोलावण्यात आले. रासायनिक तपासणीत ही पावडर (एम.डी.) असल्याचे स्पष्ट झाले.त्यानंतर आरोपी अझहर कुरेशीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सांगितले की तो मुंबई येथून एमडी घेऊन सोलापूरात विक्रीसाठी आला होता. याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्टच्या कलम ८(क), २२(ब), २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा पुढील तपास सहाय्यक निरीक्षक दत्तात्रय काळे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राज कुमार, उप-आयुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहा. पोलीस आयुक्त राजन माने, व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.या मोहिमेत सहाय्यक निरीक्षक दत्तात्रय काळे, उप निरीक्षक शामकांत जाधव, तसेच पोलीस अंमलदार बापू साठे, सैपन सय्यद, वसिम शेख, सुभाष मुंढे, अनिल जाधव, कुमार शेळके, मच्छिंद्र राठोड आणि प्रकाश गायकवाड यांनी सहभाग घेतला.
अंमली पदार्थांविरोधातील मोहिमेला वेग
सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाने गेल्या काही महिन्यांपासून अंमली पदार्थांच्या विक्रेत्यांवर आणि पुरवठादारांवर मोठ्या प्रमाणात कारवाया सुरू केल्या आहेत. ही कारवाई त्या मोहिमेतील आणखी एक यशस्वी पाऊल ठरली आहे. सोलापूर शहरातील एमडी नेटवर्क मुंबईतून कार्यरत असल्याचे पुरावे समोर येत आहेत आणि त्यावर पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.


















