१ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२३-२४ साठीचं बजेट सादर केलं. त्याआधी काही दिवसांपासून भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांना अमेरिकी रिसर्च फर्म हिंडेनबर्गच्या रिपोर्टने मोठा झटका होता. त्याचाच परिणाम अदानींच्या नेटवर्थवर झाला आहे. फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, जगातील टॉप अब्जाधिशांच्या लिस्टमध्ये सामिल असलेले अदानी हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर १६व्या क्रमांकावर पोहोचले आहेत.
एका आठवड्याआधी गौतम अदानींच्या नेटवर्थमध्ये मोठे चढ-उतार झाले. २४ जानेवारी रोजी हिंडेनबर्गने अदानी ग्रुपबाबत एक रिपोर्ट पब्लिश केला होता. या रिपोर्टमध्ये अदानी ग्रुपवर कर्जाबाबत अनेक दावे करण्यात आले आहेत. हा रिपोर्ट आल्यानंतर अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.
अदानींच्या नेटवर्थमध्ये घसरण
हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर अदानींच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याचा परिणाम त्यांच्या नेटवर्थवरही झाला आहे. अदानी जगातील टॉप १० श्रीमंतांच्या यादीतून बाहेर गेले आहेत. आता अदानी या लिस्टमध्ये १५व्या क्रमांकावर आहेत.
फोर्ब्सच्या रिअल टाइम बिलेनिअर्स इंडेक्सनुसार, मागील २४ तासांत गौतम अदानींच्या नेटवर्थमध्ये १३.१ अब्ज डॉलर्सची घसरण झाली आहे. आता अदानींची एकूण संपत्ती ७५.१ अब्ज डॉलर इतकी आहे.
मागील वर्षी २०२२ मध्ये गौतम अदानी जगातील श्रीमंतांच्या यादीमध्ये टॉप १० मध्ये दुसऱ्या स्थानी होते. त्यानंतर २०२३ च्या सुरुवातीला अदानी चौथ्या क्रमांकावर आले आणि आता हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर १५व्या स्थानी पोहोचले आहेत.
मुकेश अंबानी कितव्या स्थानी?
फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, अब्जाधिशांच्या टॉप १० यादीमधून गौतम अदानी बाहेर पडले असले, तरी भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी १०व्या स्थानी टॉप १० मध्ये परतले आहेत. मुकेश अंबानी ८३.७ अब्ज डॉलरसह जगातील १०व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.