अभ्यासात कमकुवत असल्यास किंवा परीक्षेत कमी गुण मिळविल्यास आपल्याला चांगली नोकरी मिळणार नाही असे अनेकांना वाटते. तसेच सरकारी नोकरीसाठी आपण पात्र ठरणार नाही असेही अनेकांचे मत बनून जाते. वास्तविक अशा विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव असतो. आयएएस अधिकारी तुषार डी सुमेरा यांच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल पाहिल्यास या विद्यार्थ्यांना नक्कीच धक्का बसेल. पण यातून अनेकांना प्रेरणा मिळेल.
गुजरातच्या भरूच जिल्ह्यात पोस्टवर असलेले तुषार डी सुमेरा सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत. खरंतर त्यांची दहावीची मार्कशीट खूप व्हायरल होत आहे. दहावीतील तुमच्या कामगिरीच्या आधारे तुमचे भविष्य ठरवले जाते, असे म्हणतात. पण आयएएस तुषार यांनी हा समज बदलला आहे. त्यांना इंग्रजीमध्ये १०० पैकी ३५, गणितात ३६ आणि विज्ञानात ३८ गुण मिळाले.
आयएएस तुषार यांनी मार्कांचे दडपण अजिबात घेतले नाही. त्यांनी २०१२ मध्ये यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आणि आयएएस बनले. माझे दहावीचे गुण पाहून सर्वजण निराश झाले होते. मी आयुष्यात काहीही साध्य करू शकणार नाही असे लोकांनी म्हटले. शाळा आणि गावकऱ्यांना देखील माझ्याकडून कोणती आशा नव्हती असे तुषार सांगतात.
दहावी आणि बारावीच्या परीक्षा पास झाल्यानंतर तुषारने ग्रॅज्युएशनमध्ये बीए केले. त्यानंतर बीएड केले आणि सहाय्यक शिक्षक म्हणून काम करायला सुरुवात केली. मुलांना शिकवत असताना आपण यूपीएससीची तयारी करावी, असे त्यांच्या मनात आले. नोकरी करताना ध्येय ठरवून तुषारने तयारी सुरू केली. यानंतर २०१२ मध्ये परीक्षेत उत्तीर्ण होऊन ते आयएएस झाले.