मुंबई – मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने इन्स्पायर फाऊंडेशन आयोजित आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) पुरस्कृत कुमार–मुली (ज्युनिअर) मुंबई जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा केशवराव दाते क्रीडांगण, आगाशे पथ, दादर (प.) येथे अत्यंत थरारक आणि रोमहर्षक लढतींच्या साक्षीने या स्पर्धेचा समारोप झाला. दोन्ही गटात ओम साईश्वर सेवा मंडळाने पहिल्यांदाच दुहेरी मुकुट पटकावत इतिहास रचला. अंतिम फेरीच्या थरारक व धमाकेदार सामन्यांमुळे प्रेक्षकांनी रोमांच अनुभवला. कुमार-मुली दोन्ही गटात ओम साईश्वर सेवा मंडळाने पहिल्यांदाच दुहेरी मुकुट मिळवत व शानदार विजय साजरे करत जिल्हा अजिंक्यपदावर सुवर्णाक्षरात नाव कोरले. ओम साईश्वर सेवा मंडळाचे हे मुलींचे तिसरे तर कुमारांचे पहिले अजिंक्यपद ठरले. यापूर्वी कुमारांमध्ये दोनवेळा त्यांना उपअजिंक्यपदावर समाधान मानावे लागले होते.
मुली – ओम साईश्वर सेवा मंडळ विरुध्द शिवनेरी सेवा मंडळ
मुलींच्या अंतिम सामन्यात ओम साईश्वर सेवा मंडळाने शिवनेरी सेवा मंडळावर ६-५ (मध्यंतर ३-२) असा १.१० मि. राखून १ गुणाने धमाकेदार विजय मिळवत तिसरे अजिंक्यपद मिळवले. ओम साईश्वरच्या कादंबरी तेरवणकर (३.३०, ४.४० मि. संरक्षण), यशस्वी कदम (नाबाद १.१०, ३.३० मि. संरक्षण व ३ गुण), निर्मिती परब (४.२० मि. संरक्षण), आर्या जाधव, आर्या गोरीवले व आर्या आचरेकर (प्रत्येकी १ गुण) यांनी तिसऱ्या अजिंक्यपदावर नाव कोरले. तर पराभूत शिवनेरीच्या आरुषी गुप्ता (५.१०, १.२० मि. संरक्षण व २ गुण), मुस्कान शेख (४.१० मि. संरक्षण व २ गुण), गौरांगी पेडणेकर (२.३०, १.३० मि. संरक्षण) व त्रिशा गुप्ता (१.१० मि. संरक्षण व १ गुण) यांनी शेवटपर्यंत जोरदार लढत देत निकराचा लढा दिला मात्र ते आपल्या संघाला पराभवापासून वाचवू शकल्या नाहीत.
कुमार – ओम साईश्वर सेवा मंडळ विरुध्द सरस्वती स्पो. क्लब (अ)
कुमारांच्या अंतिम सामन्यात ओम साईश्वर सेवा मंडळाने सरस्वती स्पो. क्लब (अ)चा १३-१२(मध्यंतर ५-६) असा चुरशीच्या सामन्यात विजय खेचून आणत व अजिंक्यपदाचा दुष्काळ संपवत विजयावर मोहर उमटवली. मध्यंतराला सरस्वतीकडे एक गुणाची आघाडी होती पण दुसऱ्या डावात ओम साईश्वरच्या खेळाडूंनी कमालीचा खेळ उंचावत प्रशिक्षक श्रीकांत गायकवाड यांनी दिलेले कानमंत्र वापरत खेळाडूंनी अशक्यप्राय सहज सोपा केला. ओम साईश्वरच्या निषाद ताम्हणकर (२, १.५० मि. संरक्षण व १ गुण), अधिराज गुरव (२.३०, १.१० मि. संरक्षण व २ गुण), सार्थक माडये (१. २.१० मि. संरक्षण व १ गुण), सुजल शिंत्रे (१.५० मि. संरक्षण व १ गुण), प्रशित मोरे (१.५० मि. संरक्षण व १ गुण), यज्ञेश मेस्त्री (१.२० मि. संरक्षण व २ गुण), आर्यन जाधव (३ गुण) यांनी कमालीचा खेळ केला व विजेतेपद खेचून आणले. तर पराभूत सरस्वतीच्या रोहन खांबे (३, २ मि. संरक्षण व २ गुण), ओम ननावरे (२.१० मि. संरक्षण), साई तुळसनकर (१.२० मि. संरक्षण व ३ गुण), यश धुलप (१, १, मि. संरक्षण व १ गुण), मनीष पालये (नाबाद १.१०, १.३० मि. संरक्षण व २ गुण), ओमकार खरंगटे (१ मि. संरक्षण व २ गुण) यांनी विजयासाठी केलेले जोरदर प्रयत्न अपयशी ठरले.
तृतीय क्रमांकाच्या सामन्यात कुमारांमध्ये वैभव स्पो. क्लबने विद्यार्थी क्रीडा केंद्र (अ) चा पराभव केला. तर मुलींमध्ये सरस्वती कन्या संघाने आर्य सेनावर विजय मिळवला.
स्पर्धेतील उत्कृष्ठ खेळाडू :
कुमार मुली
अष्टपैलू खेळाडू :- अधिराज गुरव (ओम साईश्वर) यशस्वी कदम (ओम साईश्वर)
उत्कृष्ट संरक्षक :- निषाद ताम्हणकर (ओम साईश्वर) कादंबरी तेरवणकर(ओम साईश्वर)
उत्कृष्ट आक्रमक :- रोहन खांबे (सरस्वती) आरुषी गुप्ता (शिवनेरी)
सदर स्पर्धेचा बक्षिस समारंभ आमदार महेश सावंत, मनसे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य यशवंत किल्लेदार, गंधेकर इलेक्ट्रिकल्स प्रा. ली.चे मालक दिवाकर गंधेकर, मुंबई खो खो संघटनेचे अध्यक्ष अॅड. अरुण देशमुख, सचिव सुरेंद्र विश्वकर्मा, इन्स्पायर फाऊंडेशनचे अध्यक्ष आदित्य गंधेकर, प्र. कार्यवाह साकेत जेस्ते हस्ते पार पडला. यावेळी पवन घाग, श्रीकांत गायकवाड, पराग आंबेकर, गुरुदत्त शिंदे, विकास पाटील, निलेश परब, निलेश सावंत, निकेत राऊत यांच्यासह मान्यवर, खेळाडू व प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


























