हिंगोली – नगर परिषद निवणुकीसाठी मंगळवारी शहरात मतदान सुरू असताना कन्या शाळेतील मतदान केंद्रातील खोली क्रमांक 2 मध्ये मतदान कक्षात जाऊन महिलेला मतदान चिन्ह सांगून गोपनीयतेच भंग केला तसेच घोषणा दिल्यामुळे केंद्राध्यक्ष यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळी 8 वाजता शिंदे सेनेचे आमदार संतोष बांगर हे मंगळवारा भागात असलेल्या कन्या शाळेतील खोली क्रमांक 2 मध्ये मतदान करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी मतदान कक्षात मतदान करण्यासाठी आलेल्या महिलेला चक्क मतदान चिन्ह सांगून गोपनीयतेच भंग केला. यावेळी आणखी एक व्यक्ती देखील मतदान कक्षात आला होता. एवढ्यावर न थांबता आ संतोष बांगर यांनी मतदान कक्षात उभे राहून शिवसेनेच्या नेत्यांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी त्यांच्या सोबत असलेल्या लोकांनीही प्रतिसाद देत घोषणाबाजी केली.
याप्रकरणी मतदान केंद्राध्यक्ष दिलीप रामेश्वर चव्हाण यांच्या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणात भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनीही निवडणुक आयोगाकडे तक्रार केली असल्याचे सांगितले आहे. निवडणुक आयोग काय कार्यवाही करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
























