बार्शी – प्रयाग कराड विश्वशांती इंग्लिश मिडियम हायस्कूल, बार्शी येथे शैक्षणिक वर्ष २०२५–२६ चा वार्षिक क्रीडा समारंभ दि. २० डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.
शाळेचे मैदान रंगीबेरंगी ध्वज, बॅनर्स व फुग्यांनी आकर्षकपणे सजविण्यात आले होते. कार्यक्रमास मान्यवर पाहुण्यांची उपस्थिती लाभली होती. प्रमुख पाहुणे म्हणून दिलीप ढेरे, (सहाय्यक पोलीस निरीक्षक, बार्शी), सचिन रणदिवे (तालुका क्रीडा अधिकारी), अनिल बनसोडे,(गटशिक्षण अधिकारी, बार्शी), डॉ. सचिन चव्हाण (प्राचार्य, एमआयटी ज्युनिअर कॉलेज) तसेच पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष व शाळेचे प्राचार्य अनीश नाथ उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने झाली. नंतर विश्वशांती प्रार्थना व गणेश वंदना सादर करण्यात आली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या वाद्यवृंद, संगीत व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी केलेले प्रभावी सूत्रसंचालन हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.
प्राचार्य अनीश नाथ यांनी वार्षिक शालेय अहवाल सादर करुन शाळेच्या विविध उपक्रमांची व भविष्यातील योजनांची माहिती दिली. मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कष्टाचे व खेळाडूवृत्तीचे कौतुक केले. विविध क्रीडा स्पर्धांतील विजेत्या संघांना पदके, चषक व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी ‘हाऊस ट्रॉफी’ यलो हाऊसने पटकावली.
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तसेच अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन अश्विनी बिडवे यांनी केले. त्यानंतर पसायदान म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



















