सोलापूर : शहर गुन्हे शाखेने एका मोठ्या आंतरराज्य घरफोडीचा छडा लावत तेलंगणातील एका सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी चोरीला गेलेली रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण २० लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
दिनांक २७ डिसेंबर २०२५ रोजी सलगरवस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘राजमुद्रा रेसिडेन्सी’ दामोदर निवास येथे राहणारे प्रकाश दामोदर वानकर यांच्या घरात धाडसी घरफोडी झाली होती. चोरट्यांनी त्यांच्या घरातून तब्बल १३ लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास केली होती. याप्रकरणी सलगरवस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने तांत्रिक तपास आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने तपास सुरू केला. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, १ जानेवारी २०२६ रोजी गुन्हे शाखेने मोईन मौलानासाब दुधेकुला वय २९, राहणार नरसापूर, जि. विकाराबाद, तेलंगणा याला ताब्यात घेतले.
आरोपी मोईन हा अत्यंत सराईत असून त्याने आपली ओळख पटू नये म्हणून चोरी करताना विशेष खबरदारी घेतली होती: त्याने घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर समजून चुकून इंटरनेट राऊटर चोरून नेला होता. हाताचे ठसे उमटू नयेत म्हणून त्याने हाताला रुमाल बांधून चोरी केली होती. चोरीच्या पैशातून तो गोव्याला जाऊन मौजमजा करण्याच्या तयारीत होता, मात्र त्याआधीच सोलापूर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.
पोलिसांनी आरोपीकडून १३ लाख ५० हजार रुपये, ७ लाख रुपये किमतीची स्विफ्ट कार, २ हजार रुपये किमतीचा इंटरनेट राऊटर असा २० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, स.पो.नि. निलेश पाटील-सोनवणे आणि त्यांच्या पथकाने केली आहे.






















