बार्शी – नेट व सेट परीक्षा प्राध्यापक पदाच्या पात्रता व नियुक्तीसाठी उत्तीर्ण होणे आवश्यक असते. त्यासाठी नियोजन, कष्ट, चिकाटी , तज्ज्ञांचे मार्गदर्शन व सराव आवश्यक आहे. या बाबी असल्यास नेट-सेट परीक्षेत यश मिळविणे शक्य आहे, असे मत डॉ. राहुल पालके यांनी व्यक्त केले.
येथील श्री शिवाजी महाविद्यालयात इंग्रजी विभागात सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्यरत असलेले प्रा.डॉ. राहुल पालके यांचे बळवंत कॉलेज सांगली येथे एकदिवशीय कार्यशाळेत व्याख्यान संपन्न झाले. इंग्रजी, इतिहास व वाणिज्य व व्यवस्थापन या विभागांनी या कार्यशाळेचे आयोजन केले होते. ते स्वतः ७ विषयात १९ वेळा उत्तीर्ण आहेत. तसेच त्यांनी या अगोदर त्यांनी विविध ठिकाणी वेगवेगळ्या शैक्षणिक विषयावर व्याख्याने दिली आहेत. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.डॉ. चंद्रकात बोबडे, उपप्राचार्य डॉ. आर. एस.मरे, इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ. संतोष राजगुरु, डॉ. आर. जी. किर्दत हे उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. पालके म्हणाले, सेट नेट परीक्षेचा अभ्यास करताना पेपर एक मध्ये सामान्य अध्ययन या घटकावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. या घटकामधील काही घटक क्लृप्त्या आणि तंत्राने अगदी सहजपणे मार्क्स देऊन जातात. काही घटकांची विशेष तयारी केल्यानंतर ते आत्मसात केले जाऊ शकतात. पेपर १ व २ चा अभ्यास संयुक्तपणे केल्यास परीक्षेत हमखास यश मिळवता येते. या कार्यशाळेत डॉ. पालके यांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करुन संदर्भ ग्रंथाचा आढावा घेवून यशाचा हमखास मंत्र दिला. प्राचार्य बोबडे यांनी नेट-सेट या परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. अचूक मार्गदर्शन व सरावाने या परीक्षांना सामोरे गेल्यास यश मिळविणे शक्य यावर त्यांनी भर दिला. प्रा. गणराज कटारे यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करुन दिली तर प्रा. पाटील मॅडम यांनी आभार मानले. प्रा. राजगुरु यांनी विद्यार्थ्यांना या मार्गदर्शनातून नक्कीच लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.





















