सोलापूर – दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील हुवण्णा सिध्दप्पा व्हनमाने यांच्या शेतातील जी९ केळीला रशियाच्या बाजारपेठात मागणी असल्यामुळे पहिल्या टप्प्यात आठ टन केळीची निर्यात करण्यात आली आहे . मंद्रूप येथील केळीचे व्यापारी जाफर बागवान यांनी रशिया येथील कंपनीशी समन्वय साधून व्हनमाने यांची केळी रशियाला पाठविली आहे . रशिया येथे जी९ केळीला पंधरा रुपये दर मिळत असल्यामुळे व्हनमाने यांनी रशियाला केळी पाठवण्याचा निर्णय घेतला . त्यानुसार मंद्रूप ची केळी रशियाला पोहोचल्याने मंद्रूपच्या शेतकर्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
जानेवारी २०२५ मध्ये हुवण्णा व्हनमाने यांच्याबरोबर त्यांचे नातू सचिन अंकुश व्हनमाने यांनी जी९ केळी लागवड करून शेतकरीमित्र राजकुमार घाटे यांच्याकडून मार्गदर्शन घेतला. यावेळी घाटे यांनी वारंवार केळी बागेला भेट देऊन औषध फवारणी व अंतरमशागत बाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर सचिन व्हनमाने यांनी सर्व रोगांपासून केळी बागेचे संरक्षण करीत केळी बागेची निगा राखली. त्यानंतर पंधरा दिवसापूर्वी त्यांची केळी पाहणी केल्यानंतर रशियाच्या व्यापार्याकडून केळी पाठविण्यास सांगण्यात आले. पहिल्या टप्यात साडे आठ टन केळी काढण्यात आली असून पंधरा रूपये किलोप्रमाणे विक्री करण्यात आली आहे. आणखी दोन टप्यात पंधरा ते वीस टन केळी उत्पादन निघणार आहे. एक वर्षात दीड लाख रूपये खर्च करून केळी लागवड केल्यानंतर चार ते पाच लाख उत्पन्न मिळाल्याने व्हनमाने परिवारामधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
मंद्रूपची केळी रशिया देशात विक्री झाल्याने परीसरातील शेतकर्यांमधून कौतुक करण्यात येत आहे.
…
….
एका वर्षात पाच लाखाचे उत्पन्न
…
एका वर्षापूर्वी जानेवारी महिन्यात एक एकर जी९ केळी लागवड केली . त्यानुसार केळी बागेची योग्य निगा राखल्यावर केळीची दर्जा चांगली असल्याने आठ दिवसापूर्वी
रशियाच्या व्यापार्याकडून मागणी आली. त्यानुसार पहिल्या टप्यात १५ रूपयांप्रमाणे साडेआठ टन केळी पाठविण्यात आली आहे. आणखी दोन टप्यात केळी पाठविण्यात येणार आहे.
सचिन व्हनमाने, शेतकरी, मंद्रुप
….
इतर शेतकर्यांनी आदर्श घ्यावे
…
शेतकर्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केल्यास फायदेशीर ठरणार आहे. मंद्रूप येथील व्हनमाने शेतकर्यांची केळी रशियाला गेल्याने तालुक्यासाठी गौरवास्पद गोष्ट आहे. इतर शेतकर्यांनी केळी लागवड करताना त्यांचे मार्गदर्शन घ्यावे.
अवधूत मुळे, तालुका कृषी अधिकारी, दक्षिण सोलापूर

















