बार्शी – ग्रामीण भागातील समस्यांची माहिती घेऊन विद्यार्थ्यांनी समाजसेवेत सहभाग घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. अब्दुल शेख यांनी केले.
श्री शिवाजी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने उपळाई (ठों) येथे विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.
यावेळी प्राचार्य डॉ. दिपक गुंड, सरपंच मधुकर वैद्य, ग्रामविकास अधिकार दत्तात्रय दराडे, माजी उपसपंच विजय ठोंगे, कृषी अधिकारी सुरेश मोरे, नाबार्ड अधिकारी अंबऋशी लोकरे, मुख्याध्यापक अनिल काळे, मुख्याध्यापक पांडुरंग कांबळे, मुख्याध्यापक सुहास वाघमारे, डॉ. श्रीराम वैद्य, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. मनोज चिकराम, प्रा. निकीता घोडके आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अब्दुल शेख होते.
पुढे प्राचार्य डॉ. शेख म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना जागृत करुन ग्रामीण जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो. अशा उपक्रमातून ग्रामीण संस्कृती समजून घेण्यास मदत होते, असे ही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. दिपक गुंड म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्वाचा विकास होतो. तसेच गावकऱ्यांच्या अनेक समस्या लक्षात घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करता येतात.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. दामाजी भिसे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. आसावरी फरताडे यांनी तर आभार रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. समाधान लोंढे यांनी मानले.


















