सोलापूर – महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २४ मध्ये यंदाच्या निवडणुकीत राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, माजी उपमहापौर राजेश काळे यांनी गेल्या कार्यकाळात केलेल्या भरीव विकासकामांचा थेट फायदा शिवसेनेच्या पॅनलला होणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. स्थानिक पातळीवर शिवसेनेचे चारही उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येतील, असा विश्वास कार्यकर्ते आणि नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
दरम्यान, माजी उपमहापौर राजेश काळे यांनी प्रभाग २४ मध्ये पायाभूत सुविधा, उद्याने, रस्ते, नागरी सोयी-सुविधा, समाजोपयोगी उपक्रम यांवर विशेष भर देत सातत्याने कामे केली. जानकी नगर बाग, बसवेश्वर उद्यान, अंतर्गत रस्ते, मोनार्क सारख्या अद्यावत दवाखान्यामध्ये मोफत लसीकरण केंद्र सुरू केले,पथदिवे, ड्रेनेज लाईन, नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडवण्यासाठी केलेली तत्पर कार्यवाही यामुळे राजेश काळे यांच्याबाबत सर्वसामान्य जनतेमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दुसरीकडे, भारतीय जनता पार्टीने सर्वसाधारण प्रवर्गातून सर्वसाधारण जातीचा उमेदवार न देता इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) मधून उमेदवार दिल्यामुळे लिंगायत समाज, ब्राह्मण समाज व मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. “आमच्या भावना डावलण्यात आल्या,” अशी चर्चा प्रभागात उघडपणे सुरू असून, या सामाजिक असंतोषाचा फटका थेट भाजपला बसण्याची चिन्हे आहेत.
याचबरोबर शेवटच्या क्षणी पक्षात बाहेरून आलेल्याना संधी देण्यात आली. कोणतीही ठोस अनुसूचित जमातीचे जात पडताळणी न करता उमेदवारी दिली गेली. त्यामुळे पोट निवडणुकीची भीती स्थानिकांना सतावत आहे. जुळे सोलापूर परिसरात तीव्र असंतोष दिसून येत आहे. “स्थानिक कार्यकर्त्यांना डावलले गेले,” अशी भावना नागरिकांमध्ये आणि पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांमध्ये असल्याचे चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर माजी उपमहापौर राजेश काळे हे स्वतः संपूर्ण ताकदीनिशी शिवसेनेच्या पॅनलच्या पाठीशी उभे राहिले आहेत. बूथनिहाय नियोजन, कार्यकर्त्यांची मोट बांधणी, घराघरांत संपर्क, विकासकामांचा अहवाल मांडत ते मतदारांशी थेट संवाद साधत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या प्रचाराला मोठे बळ मिळाले आहे. प्रभाग २४ ड सर्वसाधारण गटामध्ये ओबीसी प्रवर्गातील उमेदवार दिल्याने तसेच
विशेषतः प्रभाग २४ मधील ‘ब’ गटात अनुसूचित जमाती महिला प्रवर्ग यामध्ये अनुसूचित जमातीची जात पडताळणी उषा राजेश काळे यांच्याकडेच असून त्या एकमेव स्थानिक उमेदवार आहेत या जोरावर त्यांचा विजय निश्चित मानला जातो आणि ‘क’ गटात ओबीसी महिला प्रवर्ग या ठिकाणी तिरंगी लढत असली, तरी प्रत्यक्ष मैदानात शिवसेनेवर लोकांचा वाढता विश्वास स्पष्टपणे दिसून येत आहे. महिलांमध्ये झालेली कामे, सुविधा, सुरक्षितता, मूलभूत प्रश्नांवर केलेली दखल यामुळे शिवसेनेच्या उमेदवारांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
एकूणच प्रभाग क्रमांक २४ मध्ये भाजपविरोधातील सामाजिक नाराजी, उबाठा गटातील उमेदवारीबाबतचा असंतोष आणि माजी उपमहापौर राजेश काळे यांच्या विकासकामांची मजबूत पार्श्वभूमी लक्षात घेता, शिवसेनेच्या चारही उमेदवारांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. येत्या निकालात प्रभाग २४ हा शिवसेनेसाठी मोठ्या विजयाचा प्रभाग ठरेल, अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.


















