पंढरपूर – इंदापूर तालुक्यातील तिर्थक्षेत्र श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान ट्रस्टची अधिकृत वेबसाईट व युट्यूब चॅनेलचा शुभारंभ जगद्गुरू श्रीमन्मध्वाचार्य मूल महासंस्थान, श्रीमदुत्तरादिमठचे मठाधीश तथा श्री श्री १००८ सत्यात्मतीर्थ स्वामीजी यांच्या हस्ते भक्तिभावपूर्ण वातावरणात पार पडला.
या पावन प्रसंगी देवस्थानचे मुख्य विश्वस्त ज्ञानेश्वर हरीभाऊ अरगडे यांच्यासह विश्वस्त प्रमोद पुरुषोत्तम दंडवते, प्रकाश विश्वंभर सुरू, रुक्मिणीकांत भगवान कळमणकर, डॉ.प्रशांत अनंत सुरू आणि अभयकुमार पांडुरंग वांकर उपस्थित होते. यावेळी स्वामींचे दिवाण शशीआचार्य, मनूर येथील मठाधिपती अनंताचार्य, तसेच सर्वेश आचार्ययांचीही मान्यवर उपस्थिती लाभली.
ही वेबसाईट निर्मितीची महत्त्वपूर्ण जबाबदारी स्वामींचे शिष्य पवन नागरहळ्ळी यांनी पार पाडली असून, त्यासाठी देवस्थानचे प्रसिद्धी प्रमुख सागर काकडे यांनी मोलाचे सहकार्य केले. या उपक्रमामुळे श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान ट्रस्ट, श्रीमदुत्तरादिमठ आणि नीरा नरसिंहपूर येथील धार्मिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक कार्य अधिक व्यापक स्तरावर पोहोचण्यास नवी दिशा मिळाली आहे.






















