सोलापूर – स्वामी विवेकानंद हे विश्व संस्कृतीचे उपासक होते. त्यांनी माणूस घडवणाऱ्या धर्माचा व चारित्र्य निर्माण करणाऱ्या शिक्षणाचा पुरस्कार केला. त्यांनी राष्ट्राला दैवत मानून तरुणांना शिवभावे, जीवसेवा करण्याचे आवाहन केले. प्रत्येक माणसात परमेश्वर असतो. प्रत्येकाने धार्मिक, सहिष्णूता पाळल्यास जगात शांतता नांदेल अशी आशा व्यक्त केली होती असे प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी सांगितले.
सोलापूरच्या स्वातंत्र्यलढ्याबद्दल बोलताना ते म्हणाले, चार नरवीरांनी पत्करलेले हौतात्म्य, पारतंत्र्यात ही चारदिवस स्वातंत्र्य उपभोगलेले हिंदुस्थानातील एकमेव शहर परिणामी ब्रिटिशांनी पुकारलेला मार्शल लॉ असा सोलापूरचा स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग लक्षणीय, प्रेरणादायक असून तो अतुलनीय त्यागाचा, स्फूर्तीदायक, पराक्रमाचा असल्याने तरुणांनी तो इतिहास जाणून स्वराज्याचे सुराज्य निर्माण करण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न करण्याचे आवाहन प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी केले.
ते फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया, सोलापूर शाखा व दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय, एन.एस.एस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय युवा दिन – स्वामी विवेकानंद जयंती, राजमाता जिजाऊ जयंती व हुतात्मा दिनानिमित्त आयोजित प्रबोधन शिबिरात ते राष्ट्र संजीवक स्वामी विवेकानंद, मार्शल लॉ या विषयवार प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. तर प्रा. डॉ. नभा काकडे यांनी राजमाता जिजाऊ यांचे जीवनकार्य या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.बी.एच.दामजी हे होते.
यावेळी व्यासपीठावर एफ.पी.ए.आय. सोलापूर शाखेचे चेअरपर्सन प्रा.डॉ.एन.बी.तेली, शाखाधिकारी सुगतरत्न गायकवाड, दयानंद महाविद्यालय, एन.एस.एस. विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुचित्रा पाटणकर, प्रा. डॉ. सुनीता गाजरे, प्रा. डॉ. साखरे मॅडम, डॉ. राजशेखर शिंदे, प्रा. डॉ. महेश साखरे, प्रा. बेरूणगीकर आदी उपस्थित होते.
प्रा. डॉ. नभा काकडे म्हणाल्या की, राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या सुसंस्कारातून छत्रपती शिवाजी महाराज घडले. त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यास प्रेरणा दिली. प्रत्येक स्त्रीने निर्भय होऊन संस्कारक्षम पिढी घडविल्यास बलशाली राष्ट्र निर्माण होऊ शकते.
दयानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एच.दामजी यांनी अध्यक्षीय समारोप केला.
मान्यवरांचा परिचय प्रा. डॉ. महेश साखरे यांनी केला. सूत्रसंचालन प्रा. डॉ. दीपाली कसबे यांनी केले. स्वागत प्रा. डॉ. एन. बी. तेली यांनी केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. सुचित्रा पाटणकर यांनी केले तर आभार सुगतरत्न गायकवाड यांनी केले.
फोटो ओळी : राष्ट्रीय युवा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे उदघाटन प्रसंगी प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर दिसत आहेत. तर व्यासपीठवर प्रा. डॉ. नभा काकडे, डॉ. एन. बी. तेली. प्राचार्य डॉ. बी. एच. दामजी, प्रा. डॉ. सुचित्रा पाटणकर, सुगतरत्न गायकवाड, प्रा. दीपाली कसबे, प्रा. डॉ. महेश साखरे आदी दिसत आहेत.*

















