पंढरपूर – वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर आज गुरुवार, दिनांक २३ जानेवारी रोजी श्री विठ्ठल व श्री रूक्मिणी मातेचा विवाह सोहळा मोठ्या भक्तिभावात व उत्साहपूर्ण वातावरणात श्री विठ्ठल सभामंडप येथे संपन्न झाला.
दुपारी ठीक ४.३० वाजता श्री विठ्ठल रूक्मिणी मातेची पाद्यपूजा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्री. राजेंद्र शेळके यांच्या शुभहस्ते सपत्नीक विधीवत पार पडली. या सोहळ्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली होती.
विवाह सोहळ्यानिमित्त दर्शनासाठी व सहभागी होण्यासाठी आलेल्या भाविकांसाठी श्री संत तुकाराम भवन व श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवास येथे अन्नप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. या अन्नप्रसादाचा सुमारे ७,००० भाविकांनी लाभ घेतला.
अन्नप्रसादामध्ये चपाती, भरले वांगे, मटकी–बटाटा–वटाणा रस्सा भाजी, दही चटणी, पापड, भजी, जिरा राईस, फोडणीचे वरण, गुलाबजाम, शिरा, बालुशाही, जिलेबी तसेच बुंदी लाडू यांचा समावेश होता. सदर भोजनप्रसाद व्यवस्थेची जबाबदारी विभाग प्रमुख श्री. विनोद पाटील व श्री. बलभिम पावले यांच्याकडे सोपविण्यात आली होती. अन्नप्रसाद वाटपासाठी विविध स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक सहकार्य करत होते.
यावेळी विवाह सोहळ्यानिमित्त प्रदक्षिणा मार्गाने भव्य व देखणी शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेमध्ये ढोलपथक, मर्दानी खेळ, लेझीम पथक, लाईट छत्री, बॅन्ड पथक यांचा समावेश होता.आकर्षक फुलांनी सजविण्यात आलेल्या रथामुळे शोभायात्रेला विशेष शोभा प्राप्त झाली. या शोभायात्रेचा आनंद घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.


























