सांगोला – संपूर्ण भारतात १४ कोटी हुन अधिक लोकांची मातृभाषा ही मराठी आहे. आईच्या प्रेमळ वासल्याने आपण आपली मराठी भाषा बोलायला लागलो. ही भाषा आपल्याला जगण्यातली सर्वात मोठी श्रीमंती देत आहे. या भाषेवर आपण नितांत प्रेम केले पाहिजे. अभिजात दर्जा मिळालेली ही मराठी भाषा आपली अस्मिता आहे असे प्रतिपादन कवी सुनील जवंजाळ यांनी केले.
ते राष्ट्रीय, राज्य तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने सोलापूरचे अध्यक्ष जिल्हा न्यायधीश एम.एस.शर्मा यांचे मार्गदर्शनाखाली तसेच सचिव पी.पी.पेठकर यांचे सहकार्याने सांगोला तालुका विधी सेवा समिती व विधिज्ञ संघ, सांगोला यांचे संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि.२३ जानेवारी रोजी सांगोला न्यायालयाच्या प्रांगणात आयोजित मराठी भाषा पंधरवडा कार्यक्रमात बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांगोला दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश पी.आर.कुलकर्णी, सह.दिवाणी न्यायाधीश ए.ए.पाटील, सांगोला विधीज्ञ संघाचे उपाध्यक्ष एस.बी.दिवसे, जि.प.प्रा.शाळा एखतपुरचे मुख्याध्यापक हणमंत जाधव उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऍड.एम.एस.पत्की यांनी अभंग गायन केले. त्यानंतर जि.प.प्रा.शाळेच्या विद्यार्थिनी सानवी उबाळेनी सावित्रीबाई फुले यांचे जीवन चरित्र मांडले. मनस्वी जाधवनी कविता वाचन व एकांकिका सादर केली. श्वेता इंगोलेनी स्त्री पुरुष समानता यावर आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड.सचिन कुलकर्णी, सूत्रसंचालन ऍड.आर.जी.बाबर यांनी केले. प्रमुख वक्त्यांची ओळख ऍड.गजानन भाकरे यांनी करून दिली. आभार ऍड.एस.आर.सावंत यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांगोला न्यायालयाचे सहा.अधिक्षक ए.एस.बमनळ्ळी, डी.डी.मायभाटे, विधी सेवा समितीचे वरिष्ठ लिपीक डी.एम.डोईफोडे यांनी परिश्रम घेतले.
मराठी भाषा संवर्धनासाठी परिसरातील लेखक मंडळी खूप कष्ट घेत आहेत, मराठी भाषा संवर्धनाची जबाबदारी ही प्रत्येकाची आहे प्रत्येकाने मराठी जपायला हवे, मराठीचा लळा वाढवायला हवा.आपणही मराठी भाषा संवर्धनासाठी प्रयत्न करायला हवेत.
– पी.आर.कुलकर्णी, दिवाणी न्यायाधीश, सांगोला.


























