बार्शी – तुकडे होतात रोज हजारदा मनाचे तरीही निःस्तब्ध बोल जनांचे … या कवितेतील ओळी स्त्री समस्येची रीघ ओढतात. बी.एस्सी. भाग- २ मधील विद्यार्थीनी कु. वैष्णवी धस हिने शिवरायांच्या विचारांची गरज आहे. या कवितेचे वाचन करुन स्त्री प्रश्नांची दाहकता प्रस्तुत केली.
राष्ट्रीय बालिका दिन व बेटी बचाव, बेटी पढाव या योजनेच्या दशकपूर्तीनिमित्त श्री शिवाजी महाविद्यालयात २१ व्या शतकात स्त्रीचे स्थान, अस्तित्व व वाटचाल या विषयावर काव्यवाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कवी जयंत महामात्रा व कवी आघा शाहीद अली यांच्या हंगर व द रिअल इमेज या कवितांमधील मथितार्थ काव्यरचनेस कारणीभूत ठरला. २१ व्या शतकात लोकशाहीचा पुनरुच्चार करणारी धस हिची कविता स्त्री विश्वाचे ज्वलंत वास्तव मांडते.
स्त्रीचे लैंगिक शोषण या विषयाची दाहकता तिच्या कवितेचा गाभा होता. विविध समस्यांना सामोरे जात आयुष्याची उभारणी करणारी स्त्री समाजातील दुष्टप्रवृत्तीचा व्यक्तींचा बळी ठरते. तिच्याबाबत केलेली अश्लील विधाने तिच्या प्रतिमेला धक्का पोहचवतात. स्वतःला सिद्ध करीत ती समाजातील विविध स्तरावर कार्य करते. परंतु तिच्या कार्याला दुय्यम स्थान दिले जाते. तिचा शारीरिक व मानसिक छळ केला जातो. समाजातील काही लोकांच्या दुष्ट वासनांना, विचारांना ती पडतात. तिच्या संघर्षाला बळ देण्याची समाजाला गरज आहे. अशावेळी छत्रपती शिवरायांच्या विचारांची समकालीन उपयुक्तता तिने कवितेतून प्रस्तुत केली.
यासमयी वर्गशिक्षक व कवी डॉ. राहुल पालके म्हणाले, वैष्णवी धस हिच्या कवितेतून स्त्री प्रश्नांना वाचा फुटली. शिक्षण व समाज यांचा धागा जोडला गेला. मुलींनी शिक्षण घेवून प्रागतिक समाजाची निर्मिती करण्यासाठी पुढे यावे त्यासाठी समाजातील विविध स्तरांवर प्रयत्न होणे गरजेचे आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य ए. बी. शेख म्हणाले, या उपक्रमाचे विशेष महत्त्व असून युवा मनांना समाजातील प्रश्नांचे आकलन होणे गरजेचे आहे. ज्ञान, करिअर करण्याबरोबर विद्यार्थ्यांना सामाजिक जाण व भावनिक बुद्धिमत्ता याचे आकलन होणे काळाची गरज आहे.
इंग्रजी विभागप्रमुख डॉ. एस. डी. पवार यांनी या कार्यक्रमातून साहित्य व समाज यांचे नाते स्पष्ट करुन स्त्री विश्वाच्या संवेदना कवितेतून जागृत झाल्या, असे मत मांडले. याप्रसंगी बी.एस्सी. भाग दोन मधील ९० विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमातून अभ्यासाबरोबरच व्यक्तिमत्व विकासाची प्रेरणा वाढीस लागणे असा अभिप्राय विद्यार्थ्यांनी दिला.

























