सोलापूर- मार्कंडेय हायस्कूल विडी घरकुल, कुंभारी येथे मकरसंक्रांती निमित्त माता पालकांसाठी आयोजित करण्यात आलेला हळदी कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक अमोघसिद्ध कुंभार होते तर जि. प. पुनर्वसन विभाग तहसीलदार सरस्वती पाटील, म्हेत्रे प्रशालेच्या मुख्याध्यापिका नीलिमा भांगे व बत्तुल शाळेच्या मुख्याध्यापिका चैताली जगदार यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी सरस्वती मातेच्या व महास्वामीजींच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. उपस्थितांचे स्वागत व सत्कार पर्यवेक्षिका सुमन बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर सहशिक्षिका ऐश्वर्या कटारे यांनी प्रास्ताविकेतून हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे महत्त्व सांगितले.
यावेळी बोलताना तहसीलदार पाटील म्हणाल्या,शिक्षण हा समाज विकासाचा पाया असून महिला ही समाज घडवणारी आदिशक्ती आहे. शिक्षण प्रवाहात महिलांची भूमिका फार महत्त्वाचे असल्याचे सांगून प्रशालेने आयोजित केलेल्या या हळदी कुंकवामुळे माता-पालकांचे प्रशालेशी असलेले स्नेहाचे नाते अधिक दृढ होणार असल्याचे सांगितले. पाहुण्यांचा परिचय सहशिक्षिका वैशाली डांगे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अश्विनी पडनूरकर यांनी केले. शेवटी उपस्थित सर्व महिलांना तिळगुळ आणि संक्रातीचे वाण देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमास माता पालकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती
























