बार्शी – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर आणि श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी संचलित बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत मौजे कासारवाडी येथे आयोजित सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार निवासी शिबिराच्या पाचव्या दिवशी ‘वैज्ञानिक दृष्टिकोन आणि शिक्षण’ या विषयावर प्रा. हेमंत शिंदे यांचे प्रभावी व प्रबोधनात्मक व्याख्यान पार पडले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सचिव .्सु्स सुरेश जगदाळे हे उपस्थित होते. आपल्या व्याख्यानात प्रा. हेमंत शिंदे यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याचे महत्त्व, निरीक्षण, प्रयोग आणि तर्कशुद्ध विचारांची गरज यावर सखोल मार्गदर्शन केले. विविध प्रात्यक्षिकांद्वारे त्यांनी अंधश्रद्धांचे भांडाफोड करत समाजाला विचार करायला भाग पाडले.
‘अंधश्रद्धा ही डोके हलवण्याची नाही तर डोके चालवण्याची वेळ आहे’, ‘जगात चमत्कार नसतो, असते फक्त हातचलाखी; चमत्कार करणारा भामटा असतो आणि चमत्काराला नमस्कार करणारा मूर्ख असतो’, अशा परखड शब्दांत त्यांनी तरुणांना व ग्रामस्थांना जागृत केले. त्यांच्या या विचारांनी उपस्थितांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाची नवी जाणीव निर्माण झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याणी पिंगळे हिने, दिव्या शिंदे हिने पाहुण्यांचा परिचय करुन दिला तर श्रावणी शिंदे हिने प्रस्तावना मांडली. निखिल नाळे याने आभारप्रदर्शन केले.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. एम. ए. ढगे, प्रा. के. एम. माळी, कासारवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर बडे, सुलाखे कॉमर्स कॉलेजच्या ज्युनिअर विभागातील शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. शिबिरातील स्वयंसेवक व स्वयंसेविकांनी शिस्तबद्ध व उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
एकाच दिवशी तीन समाजोपयोगी उपक्रमांनी कासारवाडी गाजले.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराचा पाचवा दिवस अत्यंत उपयुक्त आणि जनजागृतीपर ठरला. या दिवशी मोफत आरोग्य तपासणी शिबिर, किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शन कार्यक्रम आणि अंधश्रद्धा निर्मूलनावर जनजागृती असे तीन महत्त्वाचे उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांचा ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. विशेषतः अंधश्रद्धा निर्मूलनावरील प्रबोधनामुळे गावामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकवाद आणि सामाजिक जाणीव अधिक बळकट झाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.























