सोलापूर : मनोरमा राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या वैचारिक, सृजनशील आणि संवादमय प्रवासाची साक्ष देणारी ‘मनोरमा शब्दगंध 2025’ या स्मरणिकेचे प्रकाशन 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते सांगली येथे करण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत मोरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या समारंभाचे आयोजन केले होते.
यावेळी सांगलीचे जिल्हाधिकारी अशोकराव काकडे, त्यांच्या सुविद्य पत्नी शरदिनी काकडे, ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत मोरे, मनोरमा मल्टिस्टेटच्या चेअरमन शोभा मोरे , पत्रकार संदीप काळे , सारिका काळे, आभाळमाया फाउंडेशनचे प्रमोद चौगुले ,डॉ. ऋचा पाटील, डॉ. सुमित मोरे, डॉ. मिताली मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा पार पडला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत मोरे होते. यावेळी सांगलीतील ज्येष्ठ साहित्यिक उपस्थित होते.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे मनोरमा संमेलनास प्रत्यक्ष उपस्थित राहू न शकलेल्या डॉ. तारा भवाळकर यांचा साहित्यविश्वातील दीर्घकालीन योगदानाबद्दल याच कार्यक्रमात गौरव करण्यात आला. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी साहित्य हे समाजाचे आत्मभान जागृत करणारे माध्यम असल्याचे सांगत, भवाळकर यांच्या लेखनाने मराठी साहित्यात विचार, संवेदना आणि मूल्यांची रुजवण केल्याचे नमूद केले. डॉ. तारा भवाळकर यांनी या स्मरणिकेचे कौतुक केले. याप्रसंगी साहित्यिक श्रीकांत मोरे यांची मुलाखतही घेण्यात आली.
मनोरमा मल्टिस्टेटच्या चेअरमन शोभा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्मरणिका साकारली असून, संकल्पना महासागर मीडिया ग्रुपचे समूह संपादक संदीप काळे यांची आहे. स्मरणिकेचे संपादन श्रीकांत मोरे व शोभा मोरे यांनी केले आहे.25 डिसेंबर रोजी सोलापूरच्या पंचतारांकित हॉटेल बालाजी सरोवर येथे दिवसभर चाललेल्या साहित्य संमेलनातील विविध सत्रे, परिसंवाद, काव्यसंमेलन, मुलाखती व साहित्यिक सन्मान यांचा सविस्तर आलेख या स्मरणिकेत मांडण्यात आला आहे.
क्यूआर कोडद्वारे स्मरणिकेचा डिजिटल अनुभव
संपूर्ण वाचनीय अशी ही स्मरणिका
क्यूआर कोडच्या माध्यमातून ही स्मरणिका डिजिटल स्वरूपातही उपलब्ध होणार असून, नव्या पिढीपर्यंत साहित्य पोहोचवण्याचा हा महत्त्वाचा प्रयत्न ठरत आहे, असे शोभा मोरे यांनी स्पष्ट केले आहे.
‘मनोरमा शब्दगंध 2025’ची वैशिष्ट्ये
सकाळी 10 ते रात्री 10 या कालावधीत झालेल्या संमेलनातील सर्व प्रमुख सत्रांचा सविस्तर आढावा.
विश्वास पाटील, रामदास फुटाणे, श्रीकांत मोरे यांच्यासह ज्येष्ठ साहित्यिकांच्या मुलाखती, काव्यसंमेलन व परिसंवाद.
अध्यक्षीय भाषण, स्वागताध्यक्षांचे मनोगत व संमेलनाची भूमिका.श्रीकांत मोरे यांच्या निवडक साहित्यकृती, कविता, चारोळ्या व प्रस्तावना. सोलापूरची साहित्यपरंपरा, साहित्य संमेलनाची गरज व समकालीन साहित्यप्रवाहांचा वेध
ही स्मरणिका केवळ आठवणींचा संग्रह नसून, मराठी साहित्याच्या जिवंत प्रवाहाचे दस्तऐवजीकरण ठरत आहे.
==============
——————————–
स्मरणिका प्रकाशनप्रसंगी (डावीकडून) महासागर मीडिया ग्रुप, मुंबईचे संपादक श्री. संदीप काळे, सौ. सारिका काळे, सौ. अनुषा मांढरे, सौ. शोभा मोरे, सौ. शरदिनी काकडे, सांगलीचे जिल्हाधिकारी श्री. अशोक काकडे, डॉ. ताराताई भवाळकर, श्री. श्रीकांत मोरे, आभाळमाया फाउंडेशनचे प्रमोद चौगुले, डॉ. सुमित मोरे, डॉ. मिताली मोरे, डॉ. ऋचा पाटील आदी.
























