नवीन नांदेड – विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास केवळ अभ्यासापुरता मर्यादित न ठेवता त्यांच्यात नेतृत्व क्षमता, समाजाभिमुख जाणीव आणि उद्देशपूर्ण जीवनदृष्टी निर्माण करण्याच्या हेतूने श्री गुरु गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्था, विष्णुपुरी, नांदेड आणि गडचिरोली येथील ‘निर्माण’ (सर्च) संस्था यांच्यात दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी सामंजस्य करार करण्यात आला.
हा करार युवक नेतृत्व विकासासाठी कार्य करणाऱ्या ‘निर्माण’ या संस्थेसोबत करण्यात आला असून, त्याअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये समाजजाणीव, स्वयंविकास, समाजसेवेची भावना तसेच उद्देशपूर्ण जीवनदृष्टी रुजविण्यावर भर देण्यात येणार आहे.
या सामंजस्य करारानुसार संस्थेमध्ये समाजजाणीव व मार्गदर्शनपर व्याख्याने, नेतृत्व विकास सत्रांचे आयोजन करण्यात येणार असून, निवडक विद्यार्थ्यांसाठी गडचिरोली येथील ‘निर्माण’ कॅम्पसमध्ये पाच दिवसांचे निवासी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.
यासोबतच स्वयंसेवा प्रशिक्षण, प्रत्यक्ष समाजकार्याचा अनुभव, सामाजिक वास्तव समजून घेण्यासाठी अभ्यासदौरे तसेच वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी पुस्तक प्रदर्शनांचे आयोजन करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, मानसिक, सामाजिक व वैयक्तिक विकास साधण्यासाठी युवक विकास अंतर्गत विशेष मूल्यांकन सत्रे घेण्यात येणार आहेत. तसेच ‘निर्माण’ संस्थेद्वारे विकसित शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वापरण्यात येणार आहे.
हा सामंजस्य करार ‘निर्माण सर्च’ संस्थेचे संचालक पद्मश्री डॉ. अभय बंग, डॉ. राणी बंग तसेच एस.जी.जी.एस.चे संचालक डॉ. मनेश कोकरे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी डॉ. अमृत बंग, विद्यार्थी कल्याण अधिष्ठाता प्रा. संजय देठे, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. अभिजीत नांदेडकर तसेच प्रथमवर्ष समन्वयक डॉ. किरण सानप यांची प्रमुख उपस्थिती होती.हा सामंजस्य करार तीन वर्षांसाठी वैध असून, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासोबतच समाजासाठी संवेदनशील, जबाबदार आणि सजग नागरिक घडण्यास निश्चितच हातभार लागेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

























